फ्रीलान्सिंग हा शब्द अलीकडे सतत कानी पडतो. ९ टू ५ जॉबऐवजी किंवा स्वतच्या व्यवसायाऐवजी अनेक माणसं फ्रीलान्सिंगचा पर्याय आजमावताना दिसत आहेत. क्रिकेटविश्वातही आता फ्रीलान्सिंगचे वारे वाहू लागले आहेत. काय आहे हा नेमका प्रकार आणि अधिकाअधिक क्रिकेटपटू फ्रीलान्सिंगकडे का वळत आहेत ते समजून घेऊया

बोर्डाशी असतो करार

प्रत्येक देशाचं एक क्रिकेट बोर्ड असतं. ठराविक म्हणजे साधारण २० ते २५ खेळाडूंशी वार्षिक करार केला जातो. या खेळाडूंचा निवडीसाठी प्राधान्याने विचार होतो. या खेळाडूंना करारबद्ध झाल्यानंतर दर वर्षाला ठराविक रक्कम मानधन म्हणून मिळते. करारबद्ध झाल्यानंतर खेळाडूला संघ खेळणार असेल तेव्हा उपलब्ध राहणं अनिवार्य असतं. दुखापत किंवा परवानगी घेऊन घेतलेला ब्रेक यांचा अपवाद होऊ शकतो. सगळे प्रमुख संघ ३६५ दिवसांपैकी २८० ते ३०० दिवस सतत खेळत असतात. करारबद्ध झाल्यानंतर टेस्ट, वनडे, टी२० अशा तिन्ही प्रकारासाठी उपलब्ध राहावं लागतं. एकप्रकारे ही नोकरीच असते. क्रिकेटपटूंच्या सेवेचा म्हणजे उपलब्ध असण्यासाठी त्यांना मानधन दिलं जातं.

करार टाळण्याचा वाढता ट्रेंड

बोर्डाशी वार्षिक करार खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळवून देतो. राष्ट्रीय संघात तुमचं स्थान पक्कं असल्याचं ते द्योतक असतं. निवडसमितीच्या स्कीम ऑफ थिंग्ज अर्थात निवडीसाठीच्या योजनांमध्ये तुम्ही आहात याचं ते निदर्शक असतं. मात्र त्याचवेळी वर्षभराची बांधिलकी राहते. दुसरं काही करायला मोकळा वेळ मिळत नाही. कुटुंबीयांना वेळ देता येत नाही.

फ्रीलान्सिंग कोणी सुरू केलं?

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. वेस्ट इंडिज हा देश नाही तर अनेक बेटरुपी देशांचा समूह आहे. उदाहरणार्थ अँटिगा, बार्बोडास, त्रिनिदाद टोबॅगो हे अन्य खेळांमध्ये स्वतंत्र देश म्हणून सहभागी होतात पण क्रिकेटमध्ये सगळ्या बेटांचा एकत्र असा वेस्ट इंडिजचा संघ खेळतो. त्यामुळे वेस्ट इंडिजला ठोस अशी ओळख नाही. वेस्ट इंडिजने १९७० आणि १९८०च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखला. मात्र त्यानंतर कॅरेबियन समूहांवर बाकी खेळ लोकप्रिय होऊ लागले. वेस्ट इंडिज क्रिकेटमधला पैसा आटला. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जगभरातल्या टी२० लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. वर्षभर वेस्ट इंडिजसाठी खेळत राहण्यापेक्षा ५-६ महिने टी२० लीग खेळून भरपूर पैसे मिळवता येतात. उरलेला वेळ कुटुंबीयांना देता येतो.

फ्रीलान्स क्रिकेटपटू बोर्डाशी करारबद्ध असतात का?

असू शकतात. पण तसं असणं त्यांना अनिवार्य नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो, कायरेन पोलार्ड, फिरकीपटू सुनील नरिन यांनी जगभरात जास्तीतजास्त टी२० लीगमध्ये खेळण्याला प्राधान्य दिलं. काही काळानंतर धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनाही यांचाच कित्ता गिरवला.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डचा कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव

न्यूझीलंडचे खेळाडू कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारू शकतात. असं कॉन्ट्रॅक्ट असेल तर खेळाडू त्यांना हव्या तेवढ्या टी२० लीगमध्ये खेळू शकतात. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा न्यूझीलंडसाठी खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. पण न्यूझीलंडसाठी ठराविक सामने खेळणं किंवा उपलब्ध राहणं त्यांना कंपल्सरी नाही. मोठ्या संघाविरुद्धच्या मालिकेचं महत्त्व ओळखून खेळाडू स्वतच उपलब्ध असल्याचं सांगतात. पैसे मिळवणं, घर चालवणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे, ते आम्ही समजू शकतो म्हणूनच कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टचा प्रस्तावाची पद्धत तयार करण्यात आली. २०२३-२४ मध्ये त्यांनी हा करार आणला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलं. यामुळे बोल्टचं न्यूझीलंडसाठी खेळणं कमी झालं. जगभरातल्या टी२० लीगमधला त्याचा सहभाग वाढला. वर्ल्डकप किंवा मोठ्या मालिकेत तो न्यूझीलंडकडून खेळतो. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असताना खुद्द कर्णधार केन विल्यमसनने कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारालं. केनपाठोपाठ डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, फिन अॅलन आणि टीम सैफर्ट यांनी कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलं आहे. कॉनवेने २ वर्षांनंतर पुन्हा एकदा नियमित कॉन्ट्रॅक्टचा पर्याय स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वीच अष्टपैलू खेळाडू मार्क चॅपमनने कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टची वाट धरली आहे.

टी२० लीगमध्ये खेळताना कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टचा फायदा कसा होतो?

राष्ट्रीय बोर्डाशी करारबद्ध नसल्याने हे खेळाडू टी२० लीगमध्ये बोर्डाच्या बांधिलकीविना सहजपणे सहभागी होऊ शकतात. समजा न्यूझीलंडचा एखादा खेळाडू बोर्डाशी करारबद्ध आहे. आयपीएलमध्ये खेळत असताना न्यूझीलंडची मालिका सुरू होत असेल तर त्याला आयपीएल सोडून त्या मालिकेत खेळायला जाणं बंधनकारक आहे. कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलं असेल तर खेळाडू लीगचे सगळे सामने खेळू शकतो. लीग सुरू असताना त्याचा संघ खेळत असला तरी त्याला त्यात खेळणं अनिवार्य नाही.

फ्रीलान्सिंगचा काही तोटे?

प्रत्येक टी२० लीगचं अर्थकारण वेगळं असतं. काही लीगची आर्थिक आघाडी बळकट नाहीये त्यामुळे मानधन विलंबाने मिळणे किंवा अर्धवट मिळणे असे प्रकार घडतात. प्रचंड स्पर्धेमुळे विशिष्ट लीगसाठी निवड न झाल्यास संधी निसटते. राष्ट्रीय बोर्डाशी करारबद्ध नसल्यामुळे दुखापतींचं व्यवस्थापन वैयक्तिक पातळीवर करावं लागतं.

भारतीय खेळाडू फ्रीलान्स होऊ शकतात का?

नाही. भारतीय खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध असतात. करारानुसार फिट खेळाडूंना टेस्ट, वनडे आणि टी२० सामन्यांसाठी उपलब्ध असणं अनिवार्य आहे. आयपीएल फ्रँचाइजी आणि भारतीय खेळाडू यांच्यात स्वतंत्र करार होतो. बीसीसीआयच्या नियमानुसार, निवृत्त झाल्याशिवाय भारतीय खेळाडू जगातल्या अन्य कोणत्याही लीगमध्ये खेळू शकत नाहीत. त्यामुळे फ्रीलान्स वगैरे पर्याय तूर्तास भारतीय खेळाडूंसाठी उपलब्ध नाही. निवृत्त झाल्यानंतर मात्र भारतीय खेळाडू कोणत्याही लीगमध्ये खेळू शकतात. रवीचंद्रन अश्विनने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलमधून निवृत्ती घेतली. बीसीसीआयशी तसंच आयपीएल संघाशी असलेला करार संपुष्टात आल्याने अश्विन सध्या युरोपियन टी स्पर्धेत खेळत आहे. अनेक माजी खेळाडू लिजंड्स लीगमध्ये खेळतात.