Indian Cricketers Back GPS Tracking Device Explanation: भारतीय खेळाडूंचा वेस्ट इंडिजविरूद्ध एकदिवसीय मालिकेतील काही फोटो व्हायरल होत आहेत. यादरम्यान त्यांच्या पाठीवर एक उठावदार भाग दिसून येत आहे. अनेकदा क्रिकेटपटू खेळताना त्यांच्या पाठीवर असा उठावदार भाग दिसला आहे. तर मोहम्मद सिराजने जर्सी काढल्यानंतर त्याच्या पाठीवर त्याच ठिकाणी एक काळ्या रंगाचं उपकरण दिसत होतं, पण हे उपकरण लावून खेळाडू मैदानावर का उतरतात आणि त्याचा काय उपयोग आहे, हे जाणून घेऊया.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय संघातील काही खेळाडूंच्या पाठीवर जर्सीमधून एक उठावदार भाग दिसून आला. त्यामुळे सामने पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये या वस्तूबाबत उत्सुकता निर्माण झाली. प्रत्यक्षात, हे एक GPS परफॉर्मन्स-ट्रॅकिंग डिव्हाइस असून, ते कॉम्प्रेशन वेस्टवरील एका खास पाऊचमध्ये बसवण्यात येतं. हे डिव्हाइस दोन्ही खांद्यांच्या पाठीच्या मधल्या भागात, म्हणजेच फोटोत दाखवल्याप्रमाणे हे उपरकण घातलं जातं. खेळाडूंच्या कामगिरीच्या दृष्टीने हे उपकरण खूप महत्त्वाचं असतं.

हे ट्रॅकर सामान्यतः STATSportsसारख्या कंपन्यांकडून तयार केले जातात. या डिव्हाइसच्या मदतीने खेळाडूच्या कामगिरीशी संबंधित अनेक आकडेवारी एकाच वेळी नोंदवली जाते. यामध्ये सामन्यात आणि सरावादरम्यान खेळाडूने कापलेलं अंतर, वेग, वेगातील बदल, हृदयाचे ठोके आणि खेळाडूवर येणारा एकूण शारीरिक ताण यांचा समावेश असतो.

या जीपीएस डिव्हाईसचा काय उपयोग आहे?

या डिव्हाइसमधून मिळणारी माहिती रिअल टाइममध्ये संघ व्यवस्थापनापर्यंत पोहोचते. खेळाडूंची फिटनेस पातळी योग्य प्रकारे व्यवस्थापित करणं, दुखापतींचा धोका कमी करणं आणि सरावाचा ताण योग्य पद्धतीने नियंत्रित करणं, हे या तंत्रज्ञानाचे प्रमुख उद्देश आहेत. गेल्या काही वर्षांत उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या पाठीवर दिसणारा हा उठावदार भाग प्रत्यक्षात खेळाडूंच्या फिटनेस आणि कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरलं जाणारं आधुनिक तंत्रज्ञान आहे.

भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेत दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. या मालिकेत भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल व शुबमन गिल यांनी शतकी खेळी साकारल्या. तर शुबमन गिलने द्विशतक देखील केलं. दरम्यान वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने या मालिकेत दोन शतकं झळकावली. या एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे.