MS Dhoni in ICC Hall Of Fame: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवड करण्यात आली आहे. आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनल २०२५ च्या आधी ९ जून रोजी एकूण सात दिग्गज खेळाडूंना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले जाईल. ७ दिग्गज खेळाडूंमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे, ज्यांना विशेष सन्मान देण्यात येईल.
हा सन्मान ‘अ डे विथ द लीजेंड्स’ नावाच्या एका विशेष कार्यक्रमाचा भाग असेल, ज्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. येथे जगभरातील चाहते क्रिकेटच्या या महान दिग्गजांना सन्मानित होताना पाहणार आहेत. भारताचा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी हा टीम इंडियाचा ११वा भारतीय खेळाडू ठरलाय, ज्याची आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवड झाली आहे.
ICC Hall of Fame म्हणजे काय?
आयसीसी हॉल ऑफ फेम हा क्रिकेटचा सर्वोच्च सन्मान आहे. क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासात आपल्या कामगिरीची छाप उमटवणाऱ्या दिग्गजांच्या कामगिरीचं कौतुक म्हणून केला जातो. याची सुरूवात २ जानेवारी २००९ रोजी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या सहकार्याने करण्यात आली.
आयसीसीच्या या सन्मानाचे मानकरी ठरण्यासाठी फलंदाजाने किमान ८००० आंतरराष्ट्रीय धावा आणि २० शतकं केलेली असावीत. ही कामगिरी कसोटी किंवा एकदिवसीय कोणत्याही स्वरूपातील असू शकते किंवा फलंदाजाची सरासरी ५० पेक्षा जास्त असावी. तर गोलंदाजांच्या बाबतीत ज्यांनी वनडे किंवा कसोटी फॉरमॅटमध्ये २०० अधिक विकेट्सचा आकडा गाठलेला असावा.
आयसीसी हॉल ऑफ फेम हा कोणत्याही क्रिकेटपटूला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाच वर्षांनी दिला जाणारा सन्मान आहे. महान सचिन तेंडुलकरने १४ नोव्हेंबर २०१३ रोजी निवृत्तीची घोषणा केली. तर सचिन तेंडुलकरची २०१९ मध्ये हॉल ऑफ फेमसाठी निवड करण्यात आली.
आतापर्यंत ११५ खेळाडूंना आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवड करण्यात आली आहे. दुबई येथे झालेल्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वी अलिकडेच हा समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अॅलिस्टर कुक, एबी डिव्हिलियर्स आणि नीतू डेव्हिड यांचा सन्मान करण्यात आला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसी हॉल फेम सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम असेल. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स देखील असतील.