India vs New zealand,ICC T20 World Cup 2026 Final: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना पार पडला. दोन्ही संघांमध्ये थरारक सामना रंगला. भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना २५३ धाव केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. सेमी फायनलमध्ये २५४ धावांचा पाठलाग करण्याचा दबाव होता. पण जेकब बेथेलच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला. हा सामना इंग्लंडने अवघ्या ७ धावांनी गमावला. फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही सांज संघ आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्चला होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जर या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला किंवा सामना रद्द झाला, तर कोणत्या संघाला जेतेपदाचा मान मिळणार? जाणून घ्या.
आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार ८ मार्चला संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. पण जर ८ मार्चला हा सामना काही कारणास्तव पूर्ण झाला नाही, तर मग उर्वरित खेळ ९ मार्चला खेळवला जाईल. जर ८ मार्चला पाऊस पडला आणि चेंडू टाकला गेला नाही, तर मग ९ मार्चला नव्याने सामना सुरू होईल.
दोन्ही दिवस पाऊस असेल तर काय होणार?
अंतिम सामन्यासाठी आयसीसीकडून अतिरिक्त ९० मिनिटे वाढवून दिली आहेत. तर राखीव दिवसासाठी १२० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आयसीसीचा पूर्ण प्रयत्न असेल की, सामन्याचा निकाल लागायलाच हवा. पण जर पावसामुळे दोन्ही दिवशी सामना रद्द झाला तर, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केलं जाईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे.
