IPL Trophy Sanskrit verse Meaning: आयपीएल २०२६ चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये आयपीएल ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी अंतिम लढत होईल. दोन्ही संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी भिडणार आहेत. आयपीएलची चमकणारी ट्रॉफी आपण अनेकदा पाहिली आहे, पहिल्या सीझनपासून आतापर्यंत ही ट्रॉफी सारख्याच स्वरूपाची राहिली आहे. पण या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, याचा अर्थ नेमका काय आहे, हे जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये यंदाचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. आरसीबीने पहिला क्वालिफायर सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली. तर गुजरातने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा पराभव करत अंतिम सामना गाठला. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ आपली दुसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानावर उतरतील.
आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार यावर सर्वांच्या आता नजरा आहेत. पण यादरम्यान आयपीएलच्या या ट्रॉफीवर लिहिलेल्या संस्कृत वाक्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. सुवर्ण आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहिलं आहे, ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिही’. याचा अर्थ जिथे प्रतिभेला संधी मिळते. आयपीएलचं हेच ब्रीदवाक्य आहे, जिथे खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. त्याच वेळी, आतापर्यंत ही विजेतेपदे जिंकलेल्या सर्व संघांची नावे देखील ट्रॉफीच्या खाली नमूद केली आहेत.
आयपीएलने गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रतिभावन खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देत त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे, सर्वच क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पोहोचत नाहीत, परंतु आयपीएलमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याचा मार्ग मिळाला. त्याद्वारे राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी देखील निर्माण होत आहेत.
आयपीएल ट्रॉफीची किंमत आणि वजन माहिती आहे का?
आयपीएल ट्रॉफीचा रंग सोनेरी असला तरी संपूर्ण ट्रॉफी ही सोन्याची नाहीये. आयपीएल ट्रॉफी प्रामुख्याने स्टर्लिंग सिल्व्हरची असून त्यावर सोन्याचं जाड प्लेटिंग केलेलं आहे. त्यात काही ॲल्युमिनियम आणि एक मजबूत लाकडी बेसचाही समावेश आहे. याच्या निर्मितीचा अंदाजे खर्च सुमारे ५० लाख रुपये असून, ट्रॉफीचं वजन सुमारे ६ ते ६.५ किलोग्रॅम आहे.
