Nickname Of Smriti Mandhana: भारतीय महिला संघातील डावखुऱ्या हाताची फलंदाज स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय फलंदाजांपैकी एक आहे. पुरूषांच्या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर अनेक मोठ्या विक्रमांसह शिखरावर आहे. अशीच कामगिरी महिलांच्या क्रिकेटमध्ये स्मृती मानधना करू शकते. स्मृती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. यासह महिलांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड देखील स्मृतीच्या नावावर आहे. सचिनला मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखतात. दरम्यान स्मृती मानधनाचं टोपणनाव काय? जाणून घ्या.

स्मृती मानधना आपल्या मैदानातील कामगिरीसह आपल्या लाईफ स्टाईलमुळेही चर्चेत असते. स्मृतीला भारतीय क्रिकेटमधील ‘क्रश’ असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तिची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान तिने काही मोठे खुलासे केले होते. यादरम्यान तिने आपलं टोपणनाव देखील सांगितलं होतं. यासह आपल्या वडिलांचा एक किस्सा देखील सांगितला होता.

आरसीबीकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये बोलताना स्मृती म्हणाली, “माझे वडील मला बेबू (bebu) अशी हाक मारतात. ते शाळेत यायचे आणि मला बेबू अशी हाक मारायचे. त्यामुळे मला खूप लाज वाटायची. मला आशा आहे की, लोक या नावाचा जास्त वापर करणार नाहीत.” स्मृतीला घरी लाडाने बेबू असं म्हटलं जातं. पण बाहेर तिला या नावाने हाक मारली जात नाही. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्मृती मानधनाने घडवला इतिहास

स्मृती मानधना सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. महिला एशिया कप स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना तिने दमदार शतकी खेळी केली. या सामन्यात तिने ६४ चेंडूंचा सामना करत १२४ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर ती महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. तसेच हे तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १८ वे शतक ठरले. यासह ती महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचली आहे.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज

स्मृती मानधना (भारत) – १०,८७९ धावा
मिताली राज (भारत) – १०,८६८ धावा
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – १०,७४० धावा
चार्लोट एड्वर्ड्स (इंग्लंड) – १०,२७३ धावा
स्टाफेन टेलर (वेस्ट इंडिज) – १०,००७ धाव