‘सामना सुरू असताना माकड येऊन बसलं तर त्यात एवढं काय? समजा असं झालं तर त्याला केळं द्या’, असा अजब सल्ला आसामचे मुख्यमंत्री आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमंत बिस्वा सरमा यांनी दिला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’तर्फे आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमादरम्यान सरमा यांना बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांमध्ये माकड येऊन बसणे, सामना सुरू असताना कबुतराची विष्ठा पडणे यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं. यंदा राजधानी दिल्लीत ‘इंडिया ओपन’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र स्पर्धेचे सामने सुरू असताना प्राणी-पक्ष्यांच्या त्रासामुळे सामने काही काळ थांबवावे लागले होते.

‘प्राणी किंवा पक्ष्यांना रोखणं अवघड आहे. हा त्यांचा अधिवास आहे. दिल्लीत माकडं असणार, आपण काहीही करू शकत नाही. वनविभागाच्या नियमानुसार आपण माकडांना हात लावू शकत नाही. त्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊ नये यासाठी काही करू शकत नाही. समजा माकड आलंच तर काय अडचण आहे? समजा काही मिनिटं सामना थांबवावा लागला तर एवढं काहीच नाही. ५-१० मिनिटांचा विषय आहे. समजा पुढे कधी माकड आलं तर त्याला केळं द्या’, असं सरमा म्हणाले.

मलेशियाच्या एका छायाचित्रकाराने इंडिया ओपन स्पर्धेच्या सामनादरम्यान प्रेक्षकांत माकड असल्याचं टिपलं. त्यावेळी तो फोटो व्हायरल झाला होता. त्यावर सरमा म्हणाले, ‘त्यावेळी माकड आलं हे खरं आहे. ते १० मिनिटं बसून होतं. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्याला तिथून बाहेर काढलं. माकडाने कोणालाही काहीही त्रास दिला नाही. त्यावेळी अंधार होता. त्यामुळे माकड येऊन बसलं आहे ते कुणाला दिसलं नाही. पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा योग्य कार्यवाही करण्यात आली’.

माकडं किंवा प्राणी पक्षी येऊ नयेत यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार का? असा प्रश्न विचारला असता सरमा म्हणाले, ‘गुवाहाटीत मी जिथे राहतो तिथे माकडं सहजपणे घरात येतात. जर आपण काझीरंगामध्ये स्टेडियम उभारलं तर गेंडा येणारच ना’.

१७ ऑगस्टपासून भारतात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. १७ वर्षांनंतर ही स्पर्धा भारतात होणार आहे. ‘माकड किंवा तत्सम प्रकार घडल्यानंतरही जागतिक बॅडमिंटन संघटनेने भारताला दोन स्पर्धांचं आयोजन सोपवलं आहे. माझ्यामते हा मोठा प्रश्न नाहीये’, असं सरमा म्हणाले.