What Is VAR System In Football: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीतील सामना अर्जेंटिना आणि इजिप्त या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. ज्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तवर ३-२ ने विजय मिळवला. या सामन्यात इजिप्तचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण रेफ्रीने दिलेल्या एका निर्णयामुळे सामना फिरला. इजिप्तकडे जेव्हा २-० ची आघाडी होती. त्यावेळी इजिप्तने आणखी एक गोल केला होता. पण रेफ्रीने VAR सिस्टीममध्ये पाहिलं आणि हा गोल अमान्य केला. फुटबॉलमधील हे VAR सिस्टीम नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या.

VAR म्हणजे काय?

क्रिकेटमध्ये निर्णय घेण्यासाठी मैदानावर २ अंपायर्स उपस्थित असतात. पण जेव्हा खेळाडू अंपारर्सने दिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यावेळी निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला जातो. त्यानंतर तिसरे अंपायर मैदानावर वेगवेगळ्या अँगलवर सेट करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करुन पडताळणी करतात आणि आपला निर्णय कळवतात. क्रिकेटमध्ये जसं DRS असतं, तसं फुटबॉलमध्ये VAR सिस्टीम असतं. VAR चा फुलफॉर्म व्हिडीओ असिस्टेंट रेफ्री. या नावातच या सिस्टीमचा अर्थ दडलेला आहे. एक असं सिस्टीम जे मैदानावर उपस्थित असलेल्या रेफ्रीला निर्णय घेण्यात मदत करतं. या सिस्टीमचा वापर जगातील मोठमोठ्या फुटबॉल स्पर्धांमध्ये केला जाऊ लागला आहे.

मुख्य बाब म्हणजे, क्रिकेट किंवा हॉकी यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूंना रिव्ह्यूची मागणी करावी लागते. पण VAR हे असं सिस्टीम आहे, ज्यात मैदानावर काही चुकीचं घडलं असेल किंवा फाउल झाला असेल तर हे सिस्टीम रेफ्रीला अलर्ट देण्याचं काम करतं. हे सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक VAR अधिकारी असतो. तर त्याला साथ देण्यासाठी ३ सहायक VAR अधिकारी असतात. हे अधिकारी संपूर्ण सामन्यादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक कृतीवर बारकाईने लक्ष देऊन असतात.

VAR कधी हस्तक्षेप करु शकतं?

१) गोल झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी- यादरम्यान ऑफ साईड आहे की नाही, पेनल्टीच्या वेळी लाईन क्रॉस झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी.

२) पेनल्टी- पेनल्टी आहे की नाही, फाउल झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी VAR चा वापर केला जातो.

३) रेड कार्ड- खेळाडूला खरंच रेड कार्ड द्यायला हवं का? फाउल खरंच इतका गंभीर होता का? हे तपासून पाहण्यासाठी VAR चा वापर केला जातो.

४) खेळाडूची ओळख – रेफ्रीने चुकून दुसऱ्याच खेळाडूला मैदानाबाहेर तर नाही पाठवलं ना? हे तपासून पाहण्यासाठी VARचा वापर केला जातो.

रेफ्रीकडे VAR ची मागणी करण्याचा अधिकार असतो. एखादा निर्णय तपासून पाहण्यासाठी किंवा निर्णयात बदल करण्यासाठी VAR चा आधार घेतला जातो. VAR ही संकल्पना २०१० मध्ये नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनने सुरु केली होती. या सिस्टीमचा उद्देश्य केवळ रेफ्रीला निर्णय घेण्यात मदत व्हावी इतकाच होता. पण ही संकल्पन सर्वांना आवडली आणि २०१२ मध्ये फिफाने या सिस्टीमचा स्वीकार केला. त्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये या सिस्टीमचा वापर केला गेला.