आयपीएलच्या नव्या हंगामाच्या निमित्ताने दुखापतग्रस्त खेळाडूंची चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने वर्कलोड मॅनेजमेंट हा शब्दही सातत्याने चर्चिला जात आहे. रविवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर कोलकाता आणि मुंबई यांच्यात लढत झाली. या लढतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीनने गोलंदाजी केली नाही. ग्रीनसाठी कोलकाताने लिलावात तिजोरी रिती केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्या सांभाळणाऱ्या ग्रीनसाठी कोलकाताने तब्बल २५.२ कोटी रुपये खर्च केले आहेत. दोनशे धावांचा डोंगर उभारूनही कोलकाताला या सामन्यात हार पत्करावी लागली. या लढतीत ग्रीनने गोलंदाजी केली नाही. सामना संपल्यानंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने याचं उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया देऊ शकतं असा टोला लगावला.

काही तासातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्रीनसंदर्भात स्पष्टीकरण जारी केलं. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच १० ते १२ दिवस ग्रीन गोलंदाजी करू शकणार नाही याची माहिती कोलकाता संघव्यवस्थापनाला देण्यात आली होती. कॅमेरुनच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून तो सावरत आहे. तो फलंदाजी सहजतेने करू शकतो पण गोलंदाजी करायला काही मर्यादा आहेत. दीड आठवड्यात तो हळूहळू गोलंदाजीला सुरुवात करेल. कोलकाता संघव्यवस्थापनाला याची जाणीव आहे.

बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानला कोलकाता संघाला बीसीसीआयच्या निर्देशानुसार रिलीज करावं लागलं. त्याच्याऐवजी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझाराबानीला संघात घेण्यात आलं. मात्र ब्लेसिंगकडे भारतीय खेळपट्यांवर खेळण्याचा अनुभव नाही. दुसरीकडे हर्षित राणा आणि आकाशदीप हे हुकूमी शिलेदार दुखापतग्रस्त झाल्याने कोलकाताची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रीनने गोलंदाजी केली असती तर कर्णधार रहाणेसाठी सुसह्य ठरलं असतं पण दुखापतीमुळे ग्रीनने गोलंदाजी केली नाही.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक केव्हिन पीटरसनने यासंदर्भात परखड भूमिका मांडली. कोलकाताने ग्रीनसाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. ग्रीन विशेषज्ञ फलंदाज म्हणून संघात असणार आहे याची कोलकाता संघव्यवस्थापनाला कल्पना असेल तर ठीक आहे. पण त्यांना अष्टपैलू ग्रीन हवा आहे आणि तो मिळत नसेल आणि त्याची कल्पनाही देण्यात आली नसेल तर मग गडबड आहे असं पीटरसनने म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भरगच्च वेळापत्रकामुळे खेळाडूंच्या कामाचा भार विभागणं अर्थात वर्कलोड मॅनेजमेंट क्रमप्राप्त झालं आहे. राष्ट्रीय संघाच्या बरोबरीने बहुतांश खेळाडू जगभरात सुरू असलेल्यी टी२० लीग तसेच डोमेस्टिक स्पर्धांमध्येही खेळत असतात. सततचं खेळणं, दुखापती, प्रवास या सगळ्याचा विचार करून क्रिकेट बोर्डांनी वर्कलोड मॅनेजमेंटवर भर द्यायला सुरुवात केली आहे. एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी वर्कलोड मॅनेजमेंट लागू करण्यात येतं. बुंध्यात पडणारे यॉर्कर, फसवे स्लोअरवन्स, उसळी घेऊन प्रतिस्पर्धी फलंदाजाचा वेध घेणारे चेंडू यामुळे जसप्रीत बुमराह भारताचं प्रमुख अस्त्र आहे. टी२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर बुमराहची ४ षटकं वजा करून नियोजन करा असं प्रतिस्पर्धी संघांना सांगितलं जातं. कारण बुमराह धावांना वेसण घालतो आणि सातत्याने विकेट्स पटकावतो. बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची लयलूट करता येत नाही. बुमराहची अॅक्शन वेगळी आहे. त्याला पाठीच्या दुखण्याने वारंवार सतावलं आहे. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात बुमराह खेळतो. याव्यतिरिक्त आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससासाठी खेळतो. भारतीय संघाला प्रत्येक सामन्यात बुमराह हवा असला तरी दुखापतींची शक्यता लक्षात घेता त्याला सगळे सामने खेळणं शक्य नाही.

यामुळे बुमराहच्या वेळापत्रकाचं नियोजन केलं जातं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात बुमराह पाचपैकी तीनच सामने खेळला. टी२० वर्ल्डकपमध्ये सगळे सामने खेळला. छोट्या संघांविरुद्धच्या मालिकेत बुमराहला विश्रांती दिली जाते. आवश्यकता असेल तर मोठ्या संघांविरुद्धही पुरवून खेळवलं जातं. कारण सतत खेळून त्याच्या शरीराला फटका बसण्यापेक्षा तो ठराविकच सामने खेळतो. भारतीय संघाचे फिजिओ, बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमी अर्थात सेंटर ऑफ एक्सलन्स इथली तज्ज्ञ मंडळी मिळून बुमराह किती खेळू शकेल याचा अंदाज घेतात. टेस्ट मॅचमध्ये सलग पाच दिवस खेळणं त्याला झेपेल ना हे पाहिलं जातं. त्याला दुखापत झाली असेल तर त्यातून सावरण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. रिहॅबचा एक ठोस कार्यक्रम ठरवला जातो. त्याची कल्पना संघव्यवस्थापनाला दिली जाते जेणेकरून त्यांना नियोजन करता येईल. प्रशिक्षक आणि कर्णधाराला बुमराह विशिष्ट मालिकेसाठी उपलब्ध असू शकेल का याची माहिती दिली जाते. बुमराह नसल्यास भारतीय आक्रमण निश्चितच कमकुवत होतं पण तो सगळे सामने खेळू शकत नाही हेही तितकंच खरं आहे.

बुमराहइतकी दुखापतींची चिंता भारताचा टेस्ट आणि वनडे कर्णधार शुबमन गिलला नाही. गिल टेस्ट आणि वनडेचा कर्णधार आहे. टी२० संघाचाही भाग आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. कर्णधार असल्यामुळे गिलला सगळे सामने खेळावेच लागतात. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात टी२० सामने खेळून लगोलग गिल भारतात टेस्ट खेळण्यासाठी दाखल झाला होता. मानेच्या दुखापतीमुळे गिल एका टेस्टमध्ये खेळू शकला नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी गिलला वेळ लागला. पु्न्हा अशी दुखापत होऊ नये यासाठी विशिष्ट उपचार सुचवले जातात. एनसीए प्रमाणित तज्ज्ञ मंडळी खेळाडूंना रिहॅब कार्यक्रम समजावून देतात.

वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत काय ठरवलं जातं?

काही खेळाडूंचं शरीर सातत्याने दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकतं. या खेळाडूंची जास्त काळजी घ्यावी लागते. काही दुखापती गंभीर नसतात पण हालचालींवर मर्यादा आणतात. अशावेळी खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी एखादं काहीतरी करू शकतो. दुखापतीतून सावरल्यानंतर दोन्ही गोष्टी करू शकतो. काही दुखापतींचं स्वरुप गुंतागुंतीचं असल्याने प्रदीर्घ काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात येतो. दुखापत ज्या भागाला झाली आहे त्याच्याशी निगडीत तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, फिजिओ मिळून वर्कलोडचा निर्णय घेतात.

वर्कलोड मॅनेजमेंट वादाचा मुद्दा का ठरतो?

प्रत्येक सामना जिंकण्यासाठी असतो. अशा वेळी सगळे खेळाडू उपलब्ध असावेत असं संघव्यवस्थापनाला वाटणं साहजिक आहे. मात्र वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सगळे खेळाडू सगळे सामने खेळू शकत नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे. मात्र दुखापतीमुळे तो पहिले काही सामने खेळू शकणार नाही. तो नक्की कधी फिट होईल याविषयी साशंकता आहे. कमिन्स ऑस्ट्रेलियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार आहे. मात्र दुखापतींच्या घेऱ्यात अडकल्यामुळे कमिन्सला सगळे सामने खेळता येत नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्ससाठी वर्कलोड मॅनेजमेंट निश्चित केलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पारंपरिक द्वंद्व अॅशेस मालिकेत कमिन्स सगळे सामने खेळू शकणार नाही असं होतं. प्रत्यक्षात कमिन्स पाचपैकी केवळ एक टेस्ट खेळला. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेतही कमिन्स खेळू शकला नाही. कमिन्सला कारकिर्दीच्या सुरुवातीपासून दुखापतींचं ग्रहण आहे. पदार्पणानंतर कमिन्स जवळपास सहा वर्ष गंभीर दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आताही तो पूर्णपणे फिट नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्स वर्षभरात किती सामने खेळू शकेल याचं एक कोष्टक तयार केलं आहे. ऑस्ट्रेलियाची निवडसमिती त्यानुसार ज्या मालिकेत कमिन्स नसेल त्याकरता पर्यायी कर्णधाराची आणि गोलंदाजाची नियुक्ती करते. पण लीगसंदर्भात गणितं वेगळी असतात. आयपीएल संघ जगातील सर्वोत्तम खेळाडू ताफ्यात असावेत यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. नेमका तोच खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांसाठी नसेल तर त्या संघाचा जेतेपदापर्यंतचा प्रवास अवघड होतो. एकावेळी दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या वाढली तर संघाच्या अडचणीत भर पडते.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील कमिन्सचा सहकारी मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या दोघांचाही असाच प्रश्न आहे. स्टार्क दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. मात्र तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. स्टार्क अॅशेस मालिकेत पाचही सामने खेळला होता. मात्र त्यानंतर तो कोणतंही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली आहे. स्टार्क दुखापतीतून सावरतो आहे. त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेला वर्कलोड मॅनेजमेंटचा मंत्र अनुसरतो आहे. मात्र दिल्लीच्या पहिल्या काही लढतीत खेळू शकणार नसल्याने स्टार्कवर प्रचंड टीका झाली. याच पद्धतीने हेझलवूड बंगळुरूत दाखल झाला आहे मात्र तो नेमका कधी खेळणार याविषयी साशंकता आहे.