यशाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना नॉर्वे संघाने हे सूत्र खूपच मनावर घेतल्याचं चित्र आहे. वर्ल्डकप अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा अशा तीन देशात होतो आहे. प्रत्येक देशात खेळाडूंच्या वास्तव्याची, खानपानाची तगडी व्यवस्था आहे. मात्र नॉर्वेच्या संघाला हे खाणं पसंत नाही. ज्या खाण्यावर त्यांचं भरणपोषण झालंय असं शेकडो किलो अन्न त्यांनी थेट नॉर्वेतून आणलं आहे. त्या अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी शेफ्सचा चमू त्यांच्याबरोबर आहे. ब्राझीलविरुद्धच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा हालंडचं खाणं तर प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवू शकतं.
पिंगट वर्ण, हिरवे डोळे, वेणीसारखी केसांची बांधलेली रचना आणि अत्यंत फिट शरीर असा हालंड नेमकं काय खातो याची सोशल मीडियावर चर्चा आहे. दिवसाला ६००० कॅलरी एवढा तो आहार घेतो. पावसात घरामागच्या बार्बेक्यूत मटण शिजतं. तो स्वत: मटण-चिकन खरेदीसाठी दुकानात जातो. टॉमहॉक स्ट्रीक, रिब्ज, शॉर्ट रिब्ज, फिलेट्स, लिव्हर असा हालंडचा तगडा आहार असतो. कच्च्या स्वरुपाचा मध आणि दूध हेही पितो. अमेरिकेत प्रक्रिया न केलेल्या दुधाच्या वापरावर बंदी आहे त्यामुळे नॉर्वे संघाचे शेफ लॅक्टोजविरहित दूध वापरतात. जेवायला काय आहे किंवा खायला काय आहे असा प्रश्न हालंडला सतत पडलेला असतो असं त्याची गर्लफ्रेंड इसाबेल हासंग जोनासनने सांगितलं.
नॉर्वेच्या संघासाठी तीन शेफ काम करतात. त्यांची टीम मिळून ६१ जणांसाठी जेवण तयार करते. नॉर्वे फुटबॉल संघटनेचे पदाधिकारीही असतील तर ही संख्या ७०पल्याड जाते. नॉर्वेत जे मिळतं त्या गोष्टी आम्ही येताना घेऊन आलो आहोत. ३०० किलो सालोमन, आर्क्टिक चार, हॅलीबूट मासे, ट्राऊट असं सगळं घेऊन आलो आहोत असं आरोन इस्पेलँड यांनी अटलांटिकशी बोलताना सांगितलं. १०० किलो जार्ल्सबर्ग चीज आणि ८० किलो नॉर्वेचं ब्राऊन चीजचा साठाही घेऊन आलोय. नॉर्वेच्या संघाने पाचवेळा वर्ल्डकपविजेत्या ब्राझीलला हरवत आगेकूच केली आहे. त्यामुळे आता नॉर्वेतून खास ताज्या माशांचा साठा येत आहे. खास विमान हे सगळं घेऊन येणार आहे. मासे आणि मटण टिकावं यासाठी ऋण ४ ते १५ तापमानाचे खास फ्रीजरही नॉर्वे संघाच्या बरोबर आहेत.
नॉर्वेचा सालोमन प्रसिद्ध आहे. नॉर्वेतून हे सगळं अमेरिकेत कसं आणायचं यासाठी लॉजिस्टिक्स तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. समुद्री अन्न निर्यातीच्या बाबतीत नॉर्वेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या अर्थकारणात १० टक्के या निर्यातीचा वाटा आहे. इस्पेलँड, एरिक तुफ्ते आणि ख्रिस्तिअन कार्लसन हे त्रिकुट आलेल्या प्रचंड साठ्यातून नॉर्वेच्या खेळाडूंसाठी रुचकर, पौष्टिक पदार्थ तयार करतात. इस्पेलँड आणि तुफ्ते यांच्यासाठी फुटबॉल संघाबरोबर काम करण्याचा पहिलाच अनुभव आहे. इस्पेलँड यांनी २०२२ मध्ये ग्लोबल यंग शेफ चॅलेंजमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. तुफ्ते यांनी नॉर्वेतल्या मिचेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये काम केलं आहे. कार्लसन १९९८ पासून संघाशी संलग्न आहेत. १९९६ साली ते फिनलंडहून नॉर्वेत आले ते तिथलेच झाले. पूर्वी खेळाडू दमल्यावर म्हणायचे- पिझ्झा किंवा बर्गर द्या. पण आता ते तब्येतीसंदर्भात अतिशय जागरुक झाले आहेत. फ्रेडरिक ऑर्सनेस आणि पॅट्रिक बर्ग यांना आपण काय खातोय याचे तपशील जाणून घ्यायला आवडतात.
