RCB vs GT, Weather Prediction: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेतील क्वालिफायर १ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर एकतर्फी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर क्वालिफायर २ सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. या दोन्ही संघांनी आतापर्यंत १-१ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. त्यामुळे दोन्ही संघाकडे दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यात जर पावसाने हजेरी लावली किंवा मग सामना काही कारणास्तव रद्द झाला, तर विजेत्या संघाचा निकाल कसा लावला जाईल? समजून घ्या.

या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर काय होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान जर पावसाने हजेरी लावली, तरीदेखील ३१ मे ला सामना पूर्ण करण्यासाठी पूर्ण जोर लावला जाईल. जर पाऊस सुरूच असेल, तर षटकं कमी करण्यात येतील. पाऊस थांबला, तर सामना पूर्ण करण्यासाठी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. याच दिवशी सामन्याचा निकाल लावण्यासाठी दोन्ही डावात कमीत कमी ५-५ षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे. पण जर ५-५ षटकांचाही खेळ होणार नसेल, तर मग सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. कारण अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

या सामन्यासाठी राखीव दिवस तर ठेवण्यात आला आहे. पण जर राखीव दिवशीही सामना झाला नाही, तर काय होणार? अशा परिस्थितीत सामना रद्द केला जाईल. तर गुणतालिकेत वरच्या स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. त्यानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जेतेपदाचा मानकरी ठरेल.

कोणता संघ मारणार बाजी?

आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गेल्या हंगामात झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला होता. तर गुजरात टायटन्स संघाने २०२२ मध्ये पहिल्याच हंगामात जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर २०२३ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता.