GT vs RR, Qualifier 2 Weather Update: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्सला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. या फेरीत राजस्थान रॉयल्स संघाचा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना करणार आहे. पण जर हा सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल? जाणून घ्या कसं असेल समीकरण.

क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. पावसामुळे सामना रद्दही होऊ शकतो. तर एका षटकाने सामन्याचा निकालही लागू शकतो. या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर पावसाने हजेरी लावली, सामना सुरू होण्यास उशीर झाला, तर सुपर ओव्हरने निकाल लावला जाऊ शकतो. पण जर सुपर ओव्हरही झाली नाही आणि सामना रद्द झाला, तर काय होणार?

सामना रद्द झाल्यास काय होणार?

हा सामना रद्द झाला किंवा सुपर ओव्हरही झाली नाही, तर आयपीएलच्या नियमानुसार गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर असलेला संघ अंतिम फेरीत धडक मारेल. त्यामुळे गुजरात टायटन्सकडे झुकतं माप असणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. तर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला होता.

हवामान कसं असेल?

आयपीएल क्वालिफायर २ चा सामना मुल्लानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून पंजाबच्या काही भागात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता १० टक्के इतकी असणार आहे. तर तापमान ३० अंश सेल्सिअस इतकं असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. तर दुसऱ्या स्थानासाठी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.