पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषक सामन्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. आघाने सांगितले की, भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला होता आणि तो खेळाडूंच्या नियंत्रणाबाहेरचा होता. पण आता सेमीफायनल आणि फायनलमध्ये भारताचा संघ आला तर काय करणार, याच उत्तर कर्णधाराने दिलं आहे.
पाकिस्तान सरकारने जाहीर केलं आहे की त्यांचा संघ टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध खेळणार नाही. पण प्रश्न असा आहे की जर दोन्ही संघ सेमीफायनल किंवा फायनलमध्ये आमनेसामने आले तर काय होईल? सलमान आघाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
कोलंबोमध्ये कॅप्टन्स डे शूटदरम्यान माध्यमांशी बोलताना सलमान आघा यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं. “भारताविरुद्धचा सामना खेळणं आमच्या नियंत्रणात नाही. हा पाकिस्तान सरकारचा निर्णय आहे आणि आम्ही सर्वजण त्याचा आदर करतो. ते जसं सांगितलं तसं आम्ही करू.”
सलमान आघा म्हणाला की, जर भारत आणि पाकिस्तान नॉकआउट सामन्यांमध्ये आमनेसामने आले तर ते पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचे पालन करतील. तो म्हणाला, ‘जर आम्हाला पुन्हा त्यांच्याशी उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत खेळायचे असेल तर आम्ही पाकिस्तान सरकारशी संवाद साधू आणि त्यांचा सल्ला पाळावा लागेल.’
सलमान आघा म्हणाला की, बांगलादेश स्पर्धेत सहभागी होत नाहीये, हे दुर्दैवी आहे. “ते आमचेच भाऊ आहेत. मी म्हणेन की ते स्पर्धेत आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आणि त्यांना या असं पाहणं खरोखरच दुःखद आहे.” गेल्या टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध झालेल्या पराभवाबद्दल सलमान आघाने मोठं वक्तव्य केलं.
सलमान आघा अमेरिकेविरूद्ध झालेल्या पराभवाबाबत म्हणाला, “गेल्या टी-२० विश्वचषकात आम्ही अमेरिकेकडून हरलो होतो, पण तो भूतकाळ आहे. हा एक नवीन विश्वचषक आहे. हा एक नवीन संघ आहे आणि आम्ही त्यासाठी खूप उत्साहित आहोत. कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच विश्वचषक आहे आणि मला पुढे येऊन संघाचे नेतृत्व करायचे आहे. मला असं वातावरण निर्माण करायचं आहे की प्रत्येक खेळाडूने आपले सर्वोत्तम प्रदर्शन करावे.”
पाकिस्तानचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. त्यानंतर त्यांचा सामना १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेशी होईल. पाकिस्तानचा सामना १५ फेब्रुवारी रोजी भारताशी होणार आहे. पण, या सामन्याची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. अंतिम साखळी सामना १८ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होईल.

