वर्ष २०२२. कोयंबतूरचं एसएनआर कॉलेज ग्राऊंडचं मैदान. दुलीप ट्रॉफीचा अंतिम मुकाबला. वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा मुकाबला. पाचव्या दिवशी सामना जिंकून जेतेपदावर कब्जा करण्यासाठी वेस्ट झोन आतूर.

द्विशतकी खेळी साकारत वेस्ट झोनला दमदार स्थिती गाठून देणाऱ्या यशस्वी जैस्वालला कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळताना शिस्त महत्त्वाची हा धडा घालून दिला. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा साऊथ झोनची स्थिती १५४/६ अशी होती. जिंकण्यासाठीचं ५२९ धावांचं प्रचंड लक्ष्य. वेस्ट झोनला जिंकण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता होती.

वेस्ट झोनकडून तनुश कोटियन आणि शम्स मुलानी हे फिरकीपटू बॉलिंग करत होते. यावेळी युवा यशस्वी जैस्वाल फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता. फलंदाजांच्या अगदी जवळच फिल्डिंग करणाऱ्या यशस्वीने साऊथ झोनच्या फलंदाजांना उद्देशून काहीतरी बोलल्याचं स्पष्ट झालं. फलंदाजांनी यासंदर्भात अंपायर्सकडे तक्रार केली. अंपायर्सनी वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी चर्चा केली. रहाणेने यशस्वीला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याला समजावलं.

थोड्या वेळानंतर फलंदाज आणि यशस्वी यांच्यात बाचाबाची झाली. रहाणेने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याने यशस्वीच्या दंडाला धरून सुनावलं. शांतपणे फिल्डिंग करण्याचा सल्ला दिला. अंपायर्सनी रहाणे, दोन्ही फलंदाज यांच्याशी बातचीत केली.

प्रकरण निवळलं असं वाटत असतानाच रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेर जाण्याची सूचना केली. कर्णधाराच्या आदेशानुसार यशस्वीने मैदान सोडलं. काही षटकं पॅव्हेलियनमध्ये काढल्यानंतर यशस्वी मैदानात परतला.

यावेळेस रहाणेने त्याला फॉरवर्ड शॉर्ट लेगऐवजी त्याला फिल्डिंगसाठी दूर उभं केलं. खेळाडूपेक्षा खेळ मोठा आहे आणि मैदानावर खेळताना मर्यादेत राहून शेरेबाजी करावी हा वस्तुपाठ रहाणेने यशस्वीसमोर ठेवला.

सामन्यात काय झालं?

वेस्ट झोनने पहिल्या डावात २७० धावा केल्या. हेत पटेलने सर्वाधिक ९८ धावा केल्या. साऊथ झोनतर्फे साईकिशोरने ५ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना साऊथ झोनने ३२७ धावांची मजल मारत आघाडी घेतली. हनुमा विहारीने ११८ धावांची शतकी खेळी केली. वेस्ट झोनतर्फे जयदेव उनाडकतने ४ तर अतित शेठने ३ विकेट्स घेतल्या.

वेस्ट झोनने दुसऱ्या डावात ५८५ धावांचा डोंगर उभारला. २०वर्षीय यशस्वीने ३० चौकार आणि ४ षटकारांसह २६५ धावांची दिमाखदार खेळी साकारली. दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा सगळ्यात कमी वयाच्या बॅट्समनच्या यादीत यशस्वी चौथ्या स्थानी आहे.

सर्फराझ खानने नाबाद १२७ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर (७१) आणि हेत पटेल (५१) यांनी अर्धशतक केलं.

साऊथ झोनला विजयासाठी ५२९ धावांचं लक्ष्य मिळालं. वेस्ट झोनच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर साऊथ झोनचा डाव २३४ धावातच आटोपला. सलामीवीर रोहन कन्नूमल ९३ तर रवी तेजाने ५३ धावांची खेळी केली. वेस्ट झोनकडून शम्स मुलानीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

यशस्वी जैस्वालची दमदार वाटचाल

उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत खेळत होता. २०१५ मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध गाईल्स शिल्ड स्पर्धेत यशस्वीने नाबाद ३१९ धावांची खेळी केली. याच सामन्यात त्याने १३ विकेट्सही घेतल्या होत्या.

२०१९मध्ये विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध यशस्वीने १५४ चेंडूत २०३ धावांची आक्रमक खेळी साकारली होती. १७व्या वर्षी द्विशतक झळकावत स्पर्धेतला सगळ्यात कमी वयाचा द्विशतकवीर ठरला होता.

२०२० मध्ये झालेल्या आयसीसी U19 स्पर्धेत यशस्वीने सर्वाधिक धावा (४००) केल्या होत्या. यशस्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. याच वर्षी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने यशस्वीला ताफ्यात समाविष्ट केलं. २०२२ मध्ये राजस्थानने ४ कोटी रुपयांच्या मानधनासह यशस्वीला संघात रिटेन केलं.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ १३ डावात यशस्वीने १००० धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वीने अमोल मुझुमदार आणि रुसी मोदी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. यशस्वीने अवघ्या ७ सामन्यात ९१च्या सरासरीने खेळताना हा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे.

रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत यशस्वीने शतक झळकावण्याची किमया केली आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही यशस्वीने द्विशतकी खेळी केली होती.