FIFA World Cup 2026 Final Match Details: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा थरार अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सुरुवातीला इंग्लंडचा संघ आघाडीवर होता. पण शेवटी अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन केलं आणि इंग्लंडवर २-१ ने दमदार विजयाची नोंद केली. सामन्यातील शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना इंग्लंडचा संघ १-० ने आघाडीवर होता. पण नेमकं तेव्हाच शेवटच्या ७ मिनिटांत अर्जेंटिनाने पुनरागमन केलं आणि इंग्लंडकडून विजय हिसकावून घेतला. यासह सलग दुसऱ्यांदा या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान फायनलचा सामना कधी, कुठे आणि भारतात किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेची फायनल केव्हा होणार?
या स्पर्धेतील फायनलचा सामना न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेची फायनल कोणत्या २ संघांमध्ये होणार?
या स्पर्धेतील फायनलचा सामना गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन या दोन बलाढ्य संघामध्ये होणार आहे.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलचा सामना किती वाजता सुरू होणार?
अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांमध्ये होणारा फायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार रविवारी १९ जुलैला रात्री ८ वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना सोमवारी २० जुलैला मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला जर हा सामना पाहायचा असेल, तर रात्री उशिरापर्यंत जागावं लागेल.
फुटबॉलसह मनोरंजनाचा तडका
फायनल सामन्याआधी आणि हाफ टाइमदरम्यान जोरदार जल्लोष देखील पाहायला मिळणार आहे. यादरम्यान शकिरा, जस्टिन बीबर, बर्ना बॉय, बीटीएस, गुस्तावो डूडामेल आणि पीएस २२ कोरस हे कलाकार परफॉर्म करताना दिसणार आहेत. त्यामुळे सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना, फुटबॉलसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांना एकाच स्टेजवर पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.
सेमी फायनलमधील पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला गॉर्डनने पहिला गोल केला आणि अर्जेंटिनाला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शेवटपर्यंत इंग्लंडचा संघ आघाडीवर होता. दरम्यान ८५ व्या मिनिटाला फर्नेंडाजने आणि त्यानंतर ९२ व्या मिनिटाला मार्टिनेजने निर्णायक गोल करून अर्जेंटिनाला हा सामना २-१ ने जिंकून दिला.
