India vs Afghanistan, ICC Under 19 World Cup 2026: आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील सुपर ६ फेरीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कधी आणि कुठे खेळवला जाईल? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ५८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात फलंदाजी करताना कनिष्क चौहानने दमदार खेळी केली. त्याने २९ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २५२ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २५३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव १९४ धावांवर आटोपला.

भारतीय संघाने गेल्यावेळी देखील स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा सेमी फायनलचा सामना ४ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक १२:३० वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

आगामी अंडर १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार) वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडु (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर.एस. अंबरीश, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग,उधव मोहन, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद ऐनाम.