India vs Afghanistan Test Live Streaming: गेले २ महिने क्रिकेट चाहत्यांना वेगवान क्रिकेट पाहायला मिळालं. आता ५ दिवसाचा क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. टी-२० क्रिकेटचा फिव्हर संपल्यानंतर आता भारतीय संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये १ कसोटी सामना आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान ही एकमेव कसोटी सामन्याची मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून सुरु होणार आहे. हा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनूसार सकाळी ९:३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेसाठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.
भारत- अफगाणिस्तान सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या लाईव्ह स्ट्रिमिंगचे मालकी हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. जर तुम्हाला हा सामना मोबाईलवर लाईव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही हा सामना जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. यासह तुमच्याकडे जर स्मार्ट टीव्ही असेल, तरीदेखील तुम्ही हा सामना जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
हा सामना किती वाजता सुरु होणार?
गेले २ महिने क्रिकेट चाहत्यांना संध्याकाळचे सामने पाहायची सवय झाली आहे. पण तुम्हाला जर हा सामना लाईव्ह पाहायचा असेल, तर सकाळी लवकर उठावं लागणार आहे. हा सामना सकाळी ९:३० वाजता सुरु होईल. तर नाणेफेक सकाळी ९ वाजता होईल.
या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार) साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
