Asian Games 2026, India vs Bangladesh Semi Final: भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार सुरूवात केली आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या लढतीत भारतीय संघाने जपानवर एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. काही तासांनंतर भारतीय संघ सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रविवारी २० सप्टेंबरला भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार आहे? जाणून घ्या.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या क्रिकेट प्रकारातील सेमीफायनलमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. भारतीय संघासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चारही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. एकाच दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना २० सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ५:३० मिनिटांनी सुरू होणार आहे. तर ५ वाजता नाणेफेक होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाचं एक पदक निश्चित होणार आहे.

भारत- बांगलादेश सामना किती वाजता सुरू होणार आहे?

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणारा सेमीफायनलचा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०: ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. तर नाणेफेक सकाळी १० वाजता होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. जो संघ जिंकेल, तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरेल. तर सामना गमावणारा संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरेल. हा सामना सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

भारतीय संघाचा दणदणीत विजय

भारतीय संघाचा क्वार्टरफायनलचा सामना भारत आणि जपान या दोन्ही संघांमध्ये पार पडला.या सामन्यात जपानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना जपानचा डाव १९.५ षटकांत अवघ्या ५७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शफाली वर्माने तुफान फटकेबाजी केली आणि भारतीय संघाने हा सामना अवघ्या ३० चेंडूंमध्ये जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर बांगलादेश आणि चीन यो दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना रद्द झाल्याने बांगलादेशचा संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरला.