India vs England 3rd ODI Match Timing: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर कार्डिफच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन केलं आणि हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. मालिकेतील तिसरा सामना जो संघ जिंकेल, त्या संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कधी आणि भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या.
भारत – इंग्लंड तिसरा वनडे सामना कधी खेळवला जाणार आहे?
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा वनडे सामना रविवारी १९ जुलैला खेळवला जाणार आहे.
हा सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा सामना हा लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ याआधी २०२२ मध्ये या मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाला १०० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारत – इंग्लंड तिसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा वनडे सामना हा भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरु होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच दुपारी ३ वाजता होईल. मालिकेतील दुसरा सामना संध्याकाळी ५:३० वाजता सुरु झाला होता. पण आता वेळेत पुन्हा बदल झाला आहे. पहिल्या वनडे सामन्याप्रमाणेच तिसरा सामनाही ३:३० वाजता सुरु होणार आहे.
भारत – इंग्लंड तिसरा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार?
माध्यमातील वृत्तानुसार, हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी संघबांधणी सुरु झाली आहे. पण रोहित या सेटअपचा भाग नसल्याचं म्हटलं जात आहे. निवडकर्त्यांनी आधीच रोहितला कल्पना दिली आहे. त्यामुळे रोहितसमोर निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतो.
