India vs England 4th T20I Match Timing: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर त्यानंतर झालेल्या दु्सऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील तिसरा सामना १२५ धावांनी जिंकून इंग्लंडने या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. जर भारतीय संघाला मालिका बरोबरीत आणायची असेल, तर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. दरम्यान मालिकेतील चौथा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा जिंकल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघात मोठा बदल केला होता. सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली. पण श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. श्रेयसच्या नेतृ्त्वात एक सामना रद्द झाला आहे, तर उर्वरीत सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता इंग्लंडविरुद्धची मालिका गमवायची नसेल, तर भारतीय संघाला चौथा टी-२० सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
केव्हा आणि कुठे होणार चौथा टी-२० सामना?
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणारा चौथा टी-२० सामना गुरुवारी ९ जुलैला खेळवला जाणार आहे. हा सामना ब्रिस्टल क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरु होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेत रात्री ९:३० वाजता होईल.
लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह हे सामने सोनी लिव अॅपवर लाईव्ह पाहता येतील. यासह हे सामने तुम्ही जियो हॉटस्टारवरही लाईव्ह पाहू शकता.
या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे.
