India vs New Zealand 5th T2OI: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने विजयाची हॅट्रिक केली आणि मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली. मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केलं. विशाखापट्टणममध्ये पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर ५० धावांनी विजय मिळवला. पण न्यूझीलंडने पुनरागमन करण्यात फार उशीर केला आहे. शेवटचा सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान पाचवा सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.
भारतीय संघाने मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हे तिन्ही सामने सहज आपल्या नावावर केले. पण मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने प्लेईंग ११ मध्ये काही बदल करून पाहिले. इशान किशन दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाला एका फलंदाजाची कमतरता जाणवली. तर दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. पण भारतीय संघाला हा सामना ५० धावांनी गमवावा लागला.
मालिकेतील शेवटचा सामना केव्हा होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा शेवटचा सामना रविवारी खेळवला जाणार नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना ३१ मार्च (शनिवारी)ला खेळवला जाणार आहे. हा सामना तिरूवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, इशान किशन (यष्टीरक्षक).

