भारतात सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन जोरदार केले जाणार आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. दोन्ही संघांचा सामना २१ जूनला मँचेस्टरमध्ये होणार आहे. त्याआधी ही ५ टी -२० सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी रंगीत तालीम असणार आहे. दरम्यान या मालिकेतील सामने केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.
भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. आता भारताचं लक्ष टी -२० वर्ल्डकप जिंकण्यावर असणार आहे. या मालिकेसाठी काश्वी गौतमचा संघात समावेश करण्यात आला आहे. यासह युवा खेळाडू अनुष्का शर्माला देखील संघात संधी देण्यात आली आहे. यासह उमा छॆत्रीला ऋचा घोषची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. गेल्या २ वर्ल्डकप स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ उपविजेता राहिला आहे. यावेळी एक पाऊल आणखी पुढे जाऊन जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे या टी -२० मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?
या मालिकेतील पहिला सामना आज (१७ एप्रिल) खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
भारत – दक्षिण आफ्रिका टी -२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
पहिला सामना -१७ एप्रिल, डर्बन, रात्री ९:३० वाजता
दुसरा सामना – १९ एप्रिल, डर्बन, संध्याकाळी ५:३० वाजता
तिसरा सामना – २२ एप्रिल, जोहान्सबर्ग, रात्री ९:३० वाजता
चौथा सामना – २५ एप्रिल, जोहान्सबर्ग, रात्री ९:३० वाजता
पाचवा सामना -२७ एप्रिल, बेनोनी, संध्याकाळी ५:३० वाजता
