आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. तर एलिमनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने जिंकून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

या स्पर्धेतील अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याआधी क्वालिफायर २ सामन्याचा थरार रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना २५४ धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाला केवळ १६२ धावणापर्यंत मजल मारता आली. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.

कधी आणि कुठे होणार क्वालिफायर २ सामना?

आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर २ फेरीतील सामना २९ मे रोजी न्यू चंदिगडमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच ७ वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स आणि जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

गुजरात टायटन्स पुनरागमन करणार का?

गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. क्वालिफायर १ मध्ये जोरदार लढत होणार असं वाटलं होतं. पण हा सामना एकतर्फी राहिला. आता राजस्थान रॉयल्सचा संघ देखील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून आला आहे. त्यामुळे गुजरातला जर हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपल्या घरच्या मैदानावर खेळायचं असेल, तर या सामन्यात आणखी जोर लावावा लागणार आहे. तर दुसरीकडे युवा कर्णधार रियान पराग राजस्थान रॉयल्स संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.