Commonwealth Games, Javelin Throw Final: ग्लासगो येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील आठव्या दिवशी आणखी काही पदकं निश्चित झाली आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भालाफेक क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य बाब म्हणजे नीरज चोप्रासह रोहित यादव आणि यश वीर सिंगने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भालाफेकमध्ये भारताला एकाहून अधिक पदकं मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान अंतिम फेरीतील लढत केव्हा होणार? जाणून घ्या.

नीरज चोप्राने ७९.६१ मीटर लांब थ्रो करुन अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर रोहितने ७८.३७ बेस्ट थ्रो करुन फायनलमध्ये प्रवेश केला. तर यशने ७८.३६ मीटर लांब थ्रो करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. भालाफेक क्रीडा प्रकारात १४ देशातील एकूण १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या १८ पैकी १२ खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला असून पदकासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत.

अंतिम लढत केव्हा होणार?

भारताला यावेळी भालाफेकमध्ये एकाहून अधिक पदक मिळण्याची आशा आहे. पदकासाठीची अंतिम लढत शनिवारी १ ऑगस्टला होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होणार आहे. ही लढत तुम्ही सोनी स्पोर्ट्स आणि सोनी लिव्ह अॅपवर लाईव्ह पाहू शकता.

पात्रता फेरीत नीरज चोप्रा ५ व्या स्थानी राहिला. तर श्रीलंकेचा रुमेश पथिराज अव्वल स्थानी राहिला. त्याने ८२.८४ मीटर लांब भाला फेकला. तर ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या अर्शद नदीमने ७८.६३ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. नीरज चोप्राने याआधी २०१८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यावेळी त्याने ८६.४७ मीटर लांब थ्रो केला होता. तर २०२२ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता.

या १२ खेळाडूंनी मिळवलं अंतिम फेरीत स्थान

रुमेश पथिराज (श्रीलंका) – ८२.८४ मीटर

अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – ८१.२९ मीटर

डाउ स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – ८०.६४ मीटर

बेन ईस्ट (इंग्लंड) – ८०.३८ मीटर

नीरज चोप्रा (भारत) – ७९.६१ मीटर

कॅमरन मॅकिन्टायर (ऑस्ट्रेलिया) – ७८.९१ मीटर

अरशद नदीम (पाकिस्तान) – ७८.६३ मीटर

किशॉन स्ट्रॅचन (बहामास) – ७८.६० मीटर

रोहित यादव (भारत) – ७८.३७ मीटर

यश वीर सिंग (भारत) – ७८.३६ मीटर

केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद अँड टोबॅगो) – ७८.२६ मीटर

चिनेचेरेम न्नामदी (नायजेरिया) – ७५.२७ मीटर