PSL 2026 Live Streaming In India: टी-२० क्रिकेटचा फिव्हर सुरू झाला आहे. येणाऱ्या २ महिन्यात क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचे एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. २९ मार्चपासून आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर आजपासून पाकिस्तान सुपर लीग म्हणजे, पीएसएल स्पर्धेच्या ११ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. आयपीएलमधून निवृत्त झालेले आणि ऑक्शनमध्ये अन्सोल्ड राहिलेले बरेचशे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील सामने भारतात लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील सामने भारतात थेट प्रक्षेपित केले जाणार नाहीत. पण या स्पर्धेतील सामने जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसारित केले जाणार आहेत. या स्पर्धेतील सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लाईव्ह दाखवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ईएसपीएनसोबत करार केला आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

जगभरात पाकिस्तान क्रिकेट लीग स्पर्धेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील सामने हे जगभरातील वेगवेगळ्या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहेत. यूकेमध्ये या स्पर्धेतील सामने ARY Digital, ARY Plus आणि Tapmad वर लाईव्ह पाहता येणार आहेत. तर बांगलादेशमध्ये Tsports, Tapmad वर लाईव्ह पाहता येणार आहेत. श्रीलंकेतील क्रिकेट चाहते Dialog television वर, नेपाळमधील क्रिकेट चाहते Tapmad वर लाईव्ह पाहू शकतात. अमेरिका आणि कॅनडातील क्रिकेट चाहते हे सामने Willow tv वर लाईव्ह पाहू शकतात.

भारतात पाकिस्तान सुपर लीगचे सामने लाईव्ह पाहता येणार का?

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील सामने भारतात पाहता येणार नाहीत. कारण भारतात ही स्पर्धा ब्रॉडकास्ट केली जाणार नाही. याआधी या स्पर्धेतील सामने फॅनकोडवर प्रक्षेपित केले जात होते. पण पहलगाम हल्ल्यानंतर फॅनकोडने पाकिस्तानचे सामने प्रक्षेपित करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे फॅनकोडचं सब्स्क्रिप्शन असूनही तुम्हाला हे सामने लाईव्ह पाहता येणार नाहीत. यावेळी ८ संघांमध्ये एकूण ४४ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन या दोन्ही संघांदरम्यान होणार आहे.