Australia Super 8 Scenario: ऑस्ट्रेलियासारखा मजबूत संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. संघातील मुख्य खेळाडू आणि संघाचा कर्णधार दुखापतग्रस्त असल्याचा ऑस्ट्रेलियाला चांगलाच फटका बसला. संघाचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे सुरूवातीचे दोन्ही सामने खेळू शकला नाही. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडसारखे अनुभवी खेळाडू आधीच स्पर्धेतून बाहरे झाले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करण्याआधीच स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करू शकतो का?

ऑस्ट्रेलिया ज्या ग्रुपमध्ये आहे, त्या ग्रुपमधून श्रीलंकेने ३ पैकी ३ सामने जिंकून सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर २ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह झिम्बाब्वेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर ३ पैकी १ सामना जिंकून २ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. जर झिम्बाब्वेने उर्वरित दोन्ही सामने गमावले, तर ऑस्ट्रेलियासाठी सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याचं दार उघडेल. यासह ऑस्ट्रेलियाला ओमानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ शेवटच्या वेळी आयसीसीच्या स्पर्धेतील साखळी फेरीतून केव्हा बाहेर झाला होता?

ऑस्ट्रेलियाचा संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये तितका मजबूत नाही. पण गोष्ट जेव्हा आयसीसीच्या स्पर्धांची येते,त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाची ताकद दुपटीने वाढते. पण गेल्या काही स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला जेतेपदाचा मान पटकावता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ शेवटच्या वेळी २००९ मध्ये आयसीसी स्पर्धेतील साखळी फेरीतून बाहेर झाला होता. आता २००९ नंतर २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ साखळी फेरीतून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी होता. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे ऑस्ट्रेलियाच्या पुढे होते.

रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने या वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना जिंकला नव्हता. २०२६ मध्ये स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण त्यावेळी मायकल क्लार्क, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नरसारखे स्टार खेळाडू संघात असतानाही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मुख्य बाब म्हणजे विराट कोहलीने त्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. त्याला २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. दरम्यान २०२५ मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.