भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतरही संघाचा पराभव झाल्यानंतर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आपण कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर माजी कर्णधार एम. एस. धोनी हा एकमेव अशी व्यक्ती होती जिने मला समोरुन मेसेज केला होता, असं विराट म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिकेवरुद्धच्या मालिकेमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर मागील वर्षी विराटने कसोटीचं कर्णधारपद सोडलं होतं. विराट मागील काही काळापासून सातत्यपूर्ण खेळी करण्यास अपयशी ठरत असल्याने त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरुनही काढण्यात आलं होतं.

नक्की वाचा >> Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवाने भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं का? भारत स्पर्धेतून बाहेर पडला?

३३ वर्षीय विराटने यापूर्वीच त्याच्या मानिसक आरोग्यासंदर्भात भाष्य केलं होतं. मात्र एका महिन्याच्या विश्रांतीनंतर विराटने आशिया चषक स्पर्धेमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या रविवारच्या सामन्यातही विराटने ६० धावांची खेळी केली. या सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताला पाच गडी राखून पराभव केला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने धोनीचा उल्लेख केला. मी कसोटी क्रिकेटचं कर्णधार पद सोडल्यानंतर त्याने मला मेसेज केला होता. दोघांमधील खास नात्याबद्दल बोलताना विराटने हे विधान केलं. माझा फोन नंबर अनेक लोकांकडे आहे पण फक्त धोनीने मला मेसेज केला. मी अनेक खेळाडूंसोबत खेळलोय मात्र धोनीनेच मेसेज करुन माझी विचारपूस केल्याचं कोहली म्हणाला.

नक्की पाहा >> Video: पाकविरुद्धच्या सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या पंत, पंड्यावर कर्णधार रोहित भडकला; ड्रेसिंग रुममध्ये दोघांना झापलं

“मी जेव्हा कसोटीचं कर्णधारपद सोडलं तेव्हा मला सर्वात आधी महेंद्र सिंग धोनीकडून मेसेज आला. मी यापूर्वी ज्या खेळाडूंसोबत खेळलोय त्यापैकी केवळ त्यानेच मेसेज केला. अनेक लोकांकडे माझा फोन नंबर आहे. मात्र फक्त धोनीनेच मला मेसेज केला. जेव्हा दोन्ही खेळाडूंना एकमेकांबद्दल आदर वाटतो तेव्हा ते नातं अधिक घट्ट होतं. जेव्हा मला गरज असते तेव्हा मी खासगी स्तरावर धोनीशी संपर्क साधतो,” असं विराटने पत्रकारांना एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं.

नक्की पाहा >> IND vs PAK Asia Cup: नाद करा पण विराटचा कुठं! खणखणीत षटकार लगावत साजरं केलं अर्धशतकं; Video झाला Viral

दरम्यान, सातत्यपूर्ण खेळी करण्यात अपयश येत असल्याच्या काळात विराटला अनेकांनी सल्ले दिल्याचंही त्याच्या बोलण्यामधून जाणवलं. अशा सल्ले देणाऱ्यांनाही विराटने या पत्रकारपरिषदेदरम्यान सुनावलं. मात्र आपल्याला एखाद्याला मदत करायची असेल तर आपण टीव्हीवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या व्यक्तीशी संपर्क साधून मदत करणाऱ्या व्यक्तींपैकी असल्याचंही विराट म्हणाला.

“वेगवेगळ्या माध्यमांमधून वेगवगेळे सल्ले देणे मला योग्य वाटत नाही, जे अनेकांनी यापूर्वीच केलं आहे. मला जर कोणाला काही सांगायचं असेल तर मी व्यक्तीगत स्तरावर त्याच्याशी संपर्क साधेन. जर तुम्ही संपूर्ण जगासमोर सल्ला देत असाल तर मला त्याचं फार महत्त्व वाटत नाही,” असं विराट म्हणाला.