शुवादित्य बोस

कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप पटकावल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात भारतीय संघ श्रीनगरला पोहोचला. वर्ल्डकप फायनलच्या मुकाबल्यात भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला चीतपट केलं होतं. तोच वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध उभा ठाकला होता. जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये ही लढत होणार होती. भारतीय संघ दाखल झाला मात्र त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं. काही दिवसांपूर्वी या संघाने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत वर्ल्डकप उंचावला होता. समस्त देशवासीयांना या विजयाचा जल्लोष साजरा केला. आता त्यांना पाकिस्तान जिंदाबाद घोषणांना सामोरं जावं लागलं होतं.

भारतीय खेळाडूंना विश्वासच बसेना. घोषणा देणाऱ्या काही लोकांच्या हातात पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानचे पोस्टर होते. थोड्या वेळात भारतीय संघाला दगड, बाटल्या, सफरचंदं यांचा मारा झेलावा लागला. नेमकं काय घडतंय कोणालाच कळेना.

‘आम्ही पाकिस्तानात दाखल झालोय असं वाटलं’, असं त्या संघाचा भाग असलेले कीर्ती आझाद म्हणाले. पण हे सगळं पाकिस्तानात घडत नव्हतं, भारतातच होतं. चिनार वृक्षाची पानगळ सुरू झाली होती. दाल लेकचा परिसर नेहमीसारखा सुकून भासत होता. हिवाळ्याची चाहूल लागलेली असतानाच श्रीनगरच्या शेर ए- काश्मीर स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिज सामना होता. ४३ वर्षानंतर याच मैदानावर डोमेस्टिक क्रिकेटमधली प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या इराणी चषकाचा सामना सुरू होत आहे. पहिल्यांदाच रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावलेल्या जम्मू काश्मीर संघासमोर शेष भारत संघाचं आव्हान असणार आहे. यानिमित्ताने या मैदानावर झालेल्या पहिल्यावहिल्या लढतीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

त्यावेळीही काश्मीरच्या निसर्गसौंदर्याची क्रिकेटपटूंवर भुरळ पडली होती. काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी क्रिकेटपटूंचं स्वागत केलं. वाझवान खोऱ्यात खेळाडूंसाठी शाही खान्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘फारुख अब्दुल्ला यांनी आमच्यासाठी अतिशय सुरेख मेजवानीचं आयोजन केलं होतं. शेर-ए-काश्मीर हे जगातल्या निसर्गरम्य स्टेडियमपैकी एक आहे. तिथे खेळताना मला इंग्लंडमध्येच खेळतोय असा भास झाला. भवतालात सगळी झाडं, छोटे स्टँड्स, छोटेखानी पॅव्हेलियन असं एकदम आटपाट नगरी वातावरण होतं. सुकून असा भवताल होता, आजही ते चित्र माझ्या लख्ख आठवत आहे’, असं आझाद यांनी सांगितलं.

पण असं म्हणून आझाद बोलायचं थांबतात. ‘त्या लोकांनी खेळपट्टी उखडली, असं आझाद म्हणाले. खेळाडू उपाहारासाठी गेलेलं असताना १२ जणांनी खेळपट्टी उखडली. त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये शौकत बक्षी आणि शबीर शहा यांचा समावेश होता. आणखी काही वर्षात ही दोन नावं काश्मीरमधल्या फुटीरतावादी गटाचा चेहरा झाली. २०११ मध्ये न्यायालयाने या सगळ्यांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली.

फुटीरतावाद्यांनी हे असं का केलं? वर्ल्डकपविजेत्या संघासमोर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या घोषणा का केल्या? कुठल्या शब्दात शेरेबाजी केली? कशा पद्धतीने खेळपट्टी उखडण्यात आली? या सगळ्याचे सामाजिक ऐतिहासिक राजकीय संदर्भ यावर स्वतंत्र लेख होईल. फुटीरतावाद्यांनी क्रिकेट सामन्याच्या आडून आपलं म्हणणं मांडलं एवढं नक्की म्हणता येईल.

भारताचे माजी कर्णधार आणि संयमी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलं की, ‘हा सामना आणि तेव्हाचं वातावरण कधीच विसरू शकणार नाही. कारकिर्दीत २४५ सामने खेळलेल्या वेंगसरकर यांनी अनेक चढउतार अनुभवले पण असा प्रकार कधीच पाहिला नाही. हा सामना, त्या आठवणी पुसून टाकाव्यात अशा आहेत. आम्ही नुकताच वर्ल्डकप जिंकलो होते, आम्हाला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळेल असं वाटत होतं. प्रत्यक्षात झालं उलटच. जमलेले सगळे आमच्याविरुद्ध होते. भारतविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. पोस्टर, फलक सगळं निषेधाचं होतं. ते वेस्ट इंडिजला साथ देत होते’.

‘भारतीय खेळाडूंसाठी हा एकदमच वेगळा अनुभव होता. सामन्याच्या आदल्या दिवशी आम्ही सरावाला गेलो तेव्हाचं वातावरण नेहमीसारखं होतं. पण सामन्याच्या दिवशी सगळं चित्र पालटलं. आम्ही वर्ल्डकप जिंकून जेमतेम तीन महिने झाले होते. संपूर्ण देशभर आनंद साजरा केला जात होता. खेळाडूंचे सत्कार होत होते’.

‘रन्स अँड रुन्स’ पुस्तकात लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी त्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. ‘सामन्याला उपस्थित जनतेपैकी बहुतांशजण पाकिस्तानचं समर्थन देणाऱ्या घोषणा देत होते. आम्ही वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत होते’, असं गावस्कर यांनी लिहिलं आहे. वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू मायकेल होल्डिंग यांनीही या सामन्याचा अनुभव सांगितला. ‘मैदानावर असंख्य पाकिस्तानचे झेंडे हवेत विहरत होते. सामन्यात कोण जिंकलं, कोण खेळलं मला आठवत नाही. भारतीय संघाने आम्हाला हरवून वर्ल्डकप जिंकला होता. त्यांना पाठिंबा असेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात इम्रान खानचं नाव घेतलं जात होतं’.

मायकेल होल्डिंग यांनी त्या सामन्यात कपिल देवला बाद केलं. वर्ल्डकपमधल्या पराभवाचा बदला अर्थात ‘रिव्हेंज सीरिज’ म्हणून या मालिकेकडे पाहिलं गेलं. थंडगार काश्मीरमध्ये भारतीय संघाचा १७६ धावांत खुर्दा उडाला. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजने बिनबाद १०८ धावांची मजल मारली. त्यानंतर धुळीचं वादळ आलं. वादळाचा जोर ओसरल्यानंतर वेस्ट इंडिजने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

‘पॅव्हेलियममधून आम्ही पाहिलं की एका जमावाने खेळपट्टी उखडली. लष्कराने त्यांना रोखलं आणि अटक केली. आमच्या किटबॅग झटपट आवरण्यात आल्या आणि हॉटेलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर मला आठवतंय त्यानुसार आम्ही लष्कराच्या विमानातून परतलो. निषेधाची बातमी आमच्यापर्यंत उशिराच पोहोचली. काहीतरी गडबड आहे हे आम्हाला लक्षात आलं पण समजलं नव्हतं’, असं आझाद म्हणाले.

मदन लाल हेही त्या सामन्याचा भाग होते. त्यांनी या सामन्याविषयी सांगितलं की, ‘सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं. नेमकं काय झालं ते पाहायला मी गेलो पण तुम्ही इथून निघालेलं बरं असं सांगण्यात आलं. लष्कराच्या लोकांनी आम्हाला हॉटेलमध्ये नेलं. आम्हाला धक्का बसला. तो गट सोडला बाकी लोक चांगले होते. संयोजनकांनाही असं काही होईल याचा अंदाज नव्हता’.

४३ वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. काही जखमांचे व्रण आजही आहेत. त्या सामन्याबद्दल काय सांगाल असं आम्ही बलविंदर संधू यांना विचारलं. ते म्हणाले, ‘तो क्रिकेटचा सामना नव्हताच. ते राजकारण होतं’.

१ ऑक्टोबरपासून याच मैदानावर ऋषभ पंतच्या नेतृत्वातील शेष भारत आणि जम्मू काश्मीरचा संघ इराणी चषक करंडकाच्या लढतीत आमनेसामने असणार आहेत. वेंगसरकर म्हणाले तसं, श्रीनगर आता खूपच शांत झालं आहे. वातावरण सुखद आहे.