टी२० वर्ल्डकप सुपर८ फेरीच्या निमित्ताने भारत आणि झिमाब्वे संघ एकमेकांसमोर आहेत. झिम्बाब्वेने प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना नमवत सुपर८मध्ये प्रवेश केला. सुपर८च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आता झिम्बाब्वेसमोर भारतीय संघाचं आव्हान आहे. भारतीय संघ प्राथमिक फेरीत अजिंक्य होता. मात्र सुपर८च्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवातून बोध घेत झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय साकारण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

वर्ल्डकपच्या निमित्ताने झिम्बाब्वेचा संघ प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात खेळणार आहे. झिम्बाब्वेने भारतात शेवटचा सामना १९ मार्च २००२ साली खेळला होता. तब्बल २४ वर्षानंतर झिम्बाब्वेचा संघ भारतात आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. २००२ मध्ये झिम्बाब्वेचा संघ अतिशय तुल्यबळ स्वरुपाचा होता. २००२ मध्ये झिम्बाब्वेचा संघ २ टेस्ट आणि ५ वनडेंसाठी भारतात आला होता. भारतीय संघाने २ टेस्टची मालिका २-० अशी तर वनडे मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.

१९ मार्च रोजी गुवाहाटी इथे झालेल्या पाचव्या वनडेत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३३३ धावांचा डोंगर उभारला होता. डावखुरा सलामीवीर दिनेश मोंगियाने १७ चौकार आणि एका षटकारासह १५९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. युवराज सिंगने ५२ चेंडूत ७५ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली होती. कर्णधार सौरव गांगुलीने २८ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेतर्फे डग्लस होंडोने २ विकेट्स घेतल्या होत्या.

१०व्या क्रमांकापर्यंत बॅटिंगची क्षमता असलेल्या झिम्बाब्वेचा डाव २३२ धावांतच आटोपला. ग्रँट फ्लॉवरने सर्वाधिक ४८ धावा केल्या. भारताकडून हरभजन सिंगने ४ तर झहीर खानने ३ विकेट्स पटकावल्या होत्या. दिनेश मोंगियाला सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्याने मालिकेत २६३ धावा आणि ३ विकेट्स पटकावल्या होत्या.

दिनेश मोंगिया आता अकादमी चालवतात. सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख आहेत. राहुल द्रविड यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. मोहम्मद कैफ समालोचन करतात. युवराज सिंग व्यवसायात रमला असला तरी युवा खेळाडूंना मार्गदर्शनही करतात. अजित आगरकर निवडसमितीचे प्रमुख आहेत. हरभजन सिंग समालोचन तसंच पॅनेल एक्सपर्ट म्हणून उपस्थित असतात. झहीर खान आयपीएल संघाच्या कोचिंग टीमचा भाग आहेत. अजय रात्रा राष्ट्रीय निवडसमितीचे सदस्य आहेत.

त्यावेळच्या झिम्बाब्वेच्या संघातील डिऑन इब्राहिम आताच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

दरम्यान टी२० प्रकारात भारत आणि झिम्बाब्वे १३ सामन्यात समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारतीय संघ १०-३ असा आघाडीवर आहे. टी२० वर्ल्डकपमध्ये हे दोन संघ केवळ एकदा आमनेसामने आले आहेत. २०२२ वर्ल्डकप स्पर्धेत मेलबर्न इथे झालेल्या लढतीत भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६१ धावांची खेळी केली होती. के.एल. राहुलने ३५ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेतर्फे शॉन विलियम्सने २ विकेट्स घेतल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेचा डाव १७.२ षटकात ११५ धावांतच गडगडला. रायन बर्लने ३५ तर सिकंदर रझाने ३४ धावांची खेळी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्विनन ३ तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.