मुंबईकर श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली जागा पक्की केली आहे. मधल्या फळीत भारतीय संघाला हवा असणारा आश्वासक फलंदाज श्रेयस अय्यरच्या रुपाने मिळाला आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये श्रेयसच्या शैलीत अनेकांना विरेंद्र सेहवागची झलक दिसली होती. पण आपल्या या शैलीचं फारसं कधी कौतुक झालं नाही असं श्रेयसने Cricbuzz संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. भारत अ संघाकडून खेळत असताना, एका सामन्यात मी अखेरच्या षटकात पुढे येऊन षटकार मारला होता, यासाठी राहुल द्रविडकडून मला ओरडा खावा लागला होता, “काय करतोय तू हे??” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

“४ दिवसीय सराव सामना होता, आणि राहुल द्रविड पहिल्यांदाच माझा खेळ बघत होते. पहिल्या दिवसाचं ते अखेरचं षटक होतं आणि मी अंदाजे ३० धावसंख्येवर खेळत होतो. त्यामुळे सर्वांचा असा अंदाज होता की मी हे अखेरचं षटक सांभाळून खेळून काढेन. राहुल सर ड्रेसिंग रुममध्ये बसून सामना पाहत होते, त्यावेळी गोलंदाजाने एक चेंडू माझ्या टप्प्यात टाकला आणि मी पुढे येऊन एक उंच षटकार खेचला. हा फटका खेळल्यानंतर ड्रेसिंग रुममधील प्रत्येकजण बाहेर येऊन माझ्याकडे पाहत होते. त्यानंतर राहुल सर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, काय करतोयस तू हे? दिवसाचं अखेरचं षटक आणि असा खेळत होतास?? त्यावेळी राहुल सरांनी माझ्या खेळाविषयी एक मत बनवलं. पण त्यानंतर काही दिवसांनी मला त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ कळला”, श्रेयस Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

तुम्ही मैदानात कसा खेळ करता हे तुमच्या नैसर्गिक शैलीवर आणि मानसिकतेवर अवलंबून असतं. पण तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचं असेल तर मानसिकदृष्ट्या कणखर असणं गरजेचं आहे. तुमचा स्वतःवर विश्वास हवा, तुमच्यात सकारात्मकता असणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी मी अनेकांना आळशी वाटायचो, पण मी त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. माझा माझ्यावर विश्वास होता, आणि मी माझ्या शैलीवर विश्वास ठेवत गेलो, श्रेयस आपल्या फलंदाजीविषयी बोलत होता. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.