scorecardresearch

Premium

Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. वर्ल्डकप स्पर्धेत पावसाने त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण केला आहे. यंदातरी हे सावट दूर होणार का?

south africa in world cup rain equation
जेव्हा पावसाने हिरावला दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मोठ्या स्पर्धेत मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची ‘चोकर्स’ नावाने हेटाळणी केली जाते. दर्जेदार संघ असूनही दक्षिण आफ्रिकेला एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आलेलं नाही. मोक्याच्या क्षणी कामगिरी ढासळण्याबरोबरंच पावसाने त्यांच्या वाटचालीत सातत्याने खोडा घातला आहे. यंदाचा विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होतो आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या स्पर्धेतही पावसाची धास्ती आहे.

१ चेंडू २२ धावांचं लक्ष्य
जायंटस्क्रीनवर झळकलेल्या या सुधारित लक्ष्याचा फोटो क्रिकेटरसिक विसरू शकत नाही. १९९२चा वर्ल्डकप. ठिकाण ऑस्ट्रेलियातलं सिडनी क्रिकेट ग्राऊंड. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 252 रन्सची मजल मारली. ग्रॅमी हिकने 9 फोरसह 83 रन्सची खेळी केली. अलेक स्टुअर्ट (३३), नील फेअरब्रदर (२८), डरमॉट रीव्ह (२५) यांनी उपयुक्त खेळी केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे अॅलन डोनाल्ड, मेरिक प्रिंगल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

South African captain Temba Bavuma slept in captain's meeting as the photo went viral memes flooded social media
World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा कॅप्टनच्या भेटीत झोपला? फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पूर
India vs South Korea Hockey: India defeated Korea 5-3 made it to the finals assured of at least a silver medal
IND vs S. Korea Hockey: हॉकीत मेडल पक्कं! भारताने कोरियावर ५-३ असा शानदार विजय मिळवत थेट अंतिम फेरीत मारली धडक
IND vs NED Warm Up: Second practice match between India and Netherlands cancelled toss did not even take place due to rain
IND vs NED Warm Up: पावसाने टीम इंडियाच्या सरावावर फिरवले पाणी, इंग्लंडनंतर भारत-नेदरलँड्स यांच्यातील सामनाही रद्द
South Africa Break India's Record
SA vs AUS: हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, ठरला जगातील पहिलाच संघ

या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने कर्णधार केपलर वेसल्सला २६ धावांवर गमावलं. त्याने १७ धावा केल्या. पीटर कर्स्टन ११ धावा करून बाद झाला. अँड्यू हडसनने ४६ धावांची खेळी करत विजयासाठी पायाभरणी केली. अड्रियन कुपरने ३६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. हॅन्सी क्रोनिएने २४ धावा केल्या. क्षेत्ररक्षणात वाकबगार जाँटी ऱ्होड्सने ३८ चेंडूत ४३ धावांची खेळी केली.

आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा लिटील मास्टर सुनील गावसकरांची वर्ल्डकपमधली खेळी ठरली होती टीकेचं लक्ष्य

अष्टपैलू ब्रायन मॅकमिलन खेळपट्टीवर होता आणि त्याच्या साथीला डेव्ह रिचर्डसन होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना विजयच दिसत होता. तेवढ्यात पाऊस अवतरला. पंचांनी मॅकमिलन-रिचर्डसन जोडीबरोबर चर्चा केली. इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहम गूचला विचारलं. दोन्ही फलंदाज खेळूया असं म्हणाले पण इंग्लंडचा कर्णधार गूचने नकार दिला. ओल्या चेंडूनिशी गोलंदाजी करणं आणि निसरड्या मैदानात क्षेत्ररक्षण करणं धोकादायक असल्याचं गूचने म्हटलं. पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडचे क्षेत्ररक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पॅव्हिलियनमध्ये परतले तेव्हा त्यांना १३ चेंडूत २२ धावांची आवश्यकता होती. पावसाचा स्पेल बराच वेळ कायम राहिल्याने डकवर्थ लुईस पद्धत लागू करण्यात आली. बऱ्याच वेळानंतर मॅकमिलन-रिचर्डसन जोडगोळी मैदानात उतरली तेव्हा जायंट स्क्रीनवर १ चेंडू २२ धावा असं सुधारित लक्ष्य दाखवण्यात आलं. हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावून घेतला. सामना अर्थातच इंग्लंडने जिंकला.

विशेष म्हणजे या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद होती. परंतु प्रक्षेपणकर्ती कंपनी चॅनेल नाईनने सामना त्यादिवशी संपला तर बरं असा आग्रह धरला.


पावसामुळे सामना बरोबरीत आणि यजमान घरी
२००३ वर्ल्डकप. यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचा मुकाबला दरबानच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. सलामीवीर मर्वन अट्टापटूने १२४ धावांची सुरेख खेळी साकारली. त्याने १८ चौकारांसह श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. अरविंदा डिसिल्व्हाने ७३ धावांची खेळी करत अट्टापटूला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद सोडला तर श्रीलंकेच्या एकाही बाकी बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेनं २६८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे जॅक कॅलिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. अँड्यू हॉलने २ विकेट्स घेतल्या

या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रॅमी स्मिथ आणि हर्षेल गिब्स यांनी ६५ धावांची सलामी दिली. स्मिथ ३५ धावा करून माघारी परतला. गॅरी कर्स्टन, जॅक कॅलिस आणि बोएटा डिप्पेनार यांच्यापैकी कुणीच मोठी खेळू करू शकले नाहीत. ७३ धावांची संयमी खेळी करून हर्षेल गिब्स तंबूत परतला.

कर्णधार शॉन पोलॉकने २५ धावा केल्या. ४५ षटकात २२९/५ अशी दक्षिण आफ्रिकेची स्थिती होती. पुढच्या ३० चेंडूत त्यांना ४० धावांची आवश्यकता होती. वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखले जाणारे मार्क बाऊचर आणि लान्स क्लुसनर मैदानात होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड होतं. पावसाचं आगमन झालं.

पावसाचा जोर वाढत गेल्याने डकवर्थ लुईस प्रणाली लागू झाली. पावसाचा जोर वाढल्याने मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर श्रीलंकेच्या स्कोरएवढाच झाला. ही मॅच टाय स्थितीत रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात आले.

गुण विभागून देण्यात आल्यामुळे यजमान दक्षिण आफ्रिकेचे ६ सामन्यात १४ गुण झाले. त्यामुळे यजमानांवर प्राथमिक फेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवली.

प्रकार बदलला, पावसाची दहशत कायम

ट्वेन्टी२० वर्ल्डकपमध्येही दक्षिण आफ्रिकेच्या वाटेत पाऊस आला होता. ऑस्ट्रेलियातल्या होबार्ट इथे आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्ध मुकाबला होता. पावसामुळे षटकांची संख्या कमी करण्यात आली. झिम्बाब्वेने ९ षटकात ७९ धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकने तडाखेबंद सुरुवात केली. तिसऱ्या षटकात आफ्रिकेच्या ५१ धावा झाल्या होत्या. आफ्रिका विजय मिळवणार हे दिसत होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं.

निकालासाठी ठराविक षटकांचा खेळ होणं आवश्यक असतं. आणखी एक षटक किंवा अगदी एक चेंडू देखील पडला असता तर आफ्रिकेला गणितीय समीकरणांन्वये विजयी घोषित करण्यात आलं असतं. पण तसं झालं नाही, सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एकेक गुण विभागून देण्यात आला. या सामन्यात विजय मिळाला असता तर दक्षिण आफ्रिकेसाठी पुढची वाटचाल सोपी झाली असती.

डकवर्थ लुईस प्रणालीनुसार पाचव्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची जी धावसंख्या असणं अपेक्षित होतं ती त्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्येच गाठली होती. पण मॅचच्या निकालासाठी पाच ओव्हरचा खेळ आवश्यक असल्याचा कौल अंपायर्सनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When rain denied south africa win in crucial match in cricket world cup psp

First published on: 27-09-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×