सचिन तेंडुलकर यांचे मित्र आहेत जगदीश चव्हाण. त्यांच्याशी ते बोलत होते. माझा खेळ त्यांनी पाहिला होता. हा मुलगा भारतासाठी खेळेल असं ते म्हणाले. तेव्हा मी मुंबईतल्या वयोगट स्पर्धांमध्ये खेळत होतो. क्लबसाठी खेळत होतो. अगदीच नवखा होतो पण माझ्यातलं कौशल्य त्यांनी टिपलं होतं. अशा शब्दात अष्टपैलू शार्दूल ठाकूरने सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या भाकिताबद्दल सांगितलं. पत्रकार सुबोध मयुरे यांच्या ‘गोष्ट एक चॅम्पियन’ची या पॉडकास्टदरम्यान शार्दूलने संघर्षमय प्रवासातील आठवणी जागवल्या.

‘त्यावेळी वांद्रे कुर्ला संकुलातलं मैदान तयार झालं होतं. तिथे मुंबई रणजी संघाचा सराव व्हायचा. ते बऱ्याचदा प्रॅक्टिसला बोलवायचे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळण्याआधीच मास्टब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. माझ्यासाठी तो क्षण स्वप्नवत होता. बोर्डाची परीक्षा सुरू झाली होती. दोन पेपर्सच्या मध्ये सुट्टी असते. तेव्हा मी त्यांना बॉलिंग करण्यासाठी गेलो होतो. बीकेसीत सराव सत्र होतं. त्यांच्याविषयी प्रचंड क्रेझ होती. भारतासाठी खेळायचं हे माझं ध्येय होतं. क्रिकेटचं दैवत असलेल्या सचिन तेंडुलकर यांना गोलंदाजी करायला मिळणार होती. त्यामुळे मी प्रचंड उत्साहात होतो. त्यांची एक झलक पाहायला मिळणं हा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी आपल्याला प्रॅक्टीससाठी बोलावलं हाच किती मोठा सन्मान होता. पालघरमध्ये बालपण गेलेल्या मुलासाठी सचिन यांना गोलंदाजी करायला मिळणं ही मोठी संधी होती. मी कधी याची कल्पनाच केली नव्हती. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास दुणावला’, असं शार्दूलने सांगितलं.

सचिन यांचं भाकीत खरं ठरलं. शार्दूलने १३ टेस्ट, ४७ वनडे आणि २५ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेटची धुळाक्षरं गिरवलेल्या शार्दूलकडे आता मुंबई संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कोरोना काळात, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय साकारला. दुखापतींनी एकेक खेळाडू जर्जर होत असताना, पहिल्याच सामन्यात ३६ला ऑलआऊट झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर चीतपट केलं. या मालिकेत शार्दूलने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या दौऱ्यात सुरुवातीला वनडे मालिका होती. शार्दूल फक्त वनडे संघाचा भाग होता. त्यावेळी एका सामन्यानंतर विमान प्रवासादरम्यान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शार्दूलला सांगितलं की तू कसोटी मालिका संपेपर्यंत संघाचा भाग असशील. त्यांच्या बोलण्याचं शार्दूलला आश्चर्य वाटलं. कारण तो संघाचा भागही नव्हता पण शास्त्री यांचे शब्द खरे ठरले. शार्दूल त्या दौऱ्यात टी२० नंतर कसोटी मालिकेतही खेळला. कर्णधार अजिंक्य रहाणेचा विश्वासू साथीदार झाला.