India vs Ireland T2OI Schedule: भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरूद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तर भारतीय अ संघातील खेळाडू अफगाणिस्तान अ आणि श्रीलंका अ विरूद्ध सुरु असलेली तिरंगी मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरूद्ध होणारी टी-२० मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहेत. ही मालिका भारतीय संघासाठी खास असणार आहे. कारण या मालिकेत आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे,१५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी. जो सध्या भारतीय अ संघाचा भाग आहे.

सध्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने पूर्ण झाले असून, भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा सामना शनिवारी २० जूनला खेळवला जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारत-आयर्लंड टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार?

भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचा कर्णधार होता. पण आता सूर्याला कर्णधारपदावरुन काढलं असून, ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. ही कर्णधार म्हणून त्याची पहिलीच मालिका असणार आहे. तर मुख्य आकर्षण म्हणजे, वैभव सूर्यवंशीला देखील या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. आतापर्यंत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरुवात करत होती. या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. पण ही जोडी फोडून पदार्पणाची संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ जूनला खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २८ जूनला आणि मालिकेतील तिसरा सामना १ जुलैला खेळवला जाईल.

आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिध कृष्णा.