सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला मैदानात आक्रमक पद्धतीने खेळायला शिकवलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान यासारख्या आक्रमक संघांसमोर सौरव गांगुलीने तितक्याच जोरदार पद्धतीने भारताचं नेतृत्व केलं होतं. कित्येकदा सौरव गांगुलीचा हा आक्रमक स्वभाव आपण सामन्यादरम्यान पाहिला आहे. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकलाही सौरव गांगुलीच्या या आक्रमक स्वभावाचा सामना करावा लागला होता. प्रसिद्ध निवेदक गौरव कपूर याच्या ‘Breakfast with Champions’ या कार्यक्रमात दिनेशने हा प्रसंग सांगितला.

“२००४ साली चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान मी भारतीय संघाचा भाग होतो. त्यावेळी मला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती आणि राखीव खेळाडू असल्यामुळे मी इतरांसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात जायचो. एका क्षणाला मैदानात जात असताना मी अचानक सौरव गांगुलीच्या अंगावर जाऊन धडकलो, त्यावेळी आधीच संतापलेल्या गांगुलीने माझ्याकडे पाहून, कोण आहे हा? कुठून आणता असल्या खेळाडूंना इथे? असं वक्तव्य केलं.” गौरव कपूरशी बोलत असताना दिनेश कार्तिकने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने संधी साधत सोशल मीडियावर दिनेश कार्तिकला ट्रोल केलं आहे.

याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मोहम्मद युसूफच्या नाबाद ८१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने ३ गडी राखत सामन्यात बाजी मारली होती. सौरव गांगुली आणि युवराज सिंह या सामन्यात भोपळा ही न फोडता माघारी परतले होते.