Cape Verde country information in Marathi: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये केप व्हर्डे संघाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केप व्हर्डेचा स्पर्धेतील पहिलाच सामना बलाढ्या स्पेन संघाविरूद्ध झाला. जगाच्या नकाशात नावही न दिसणारा केप व्हर्डे या छोट्याशा संघाने अनेकदा चॅम्पियन ठरलेल्या स्पेन संघाविरूद्धचा सामना ०-० असा बरोबरीत सोडवला. केप व्हर्डेचा गोलकिपर ४० वर्षीये व्हझिनो याने स्पेनचे ८ गोल अडवले आणि ऐतिहासिक कामगिरी केली. पण हा केप व्हर्डे देश नेमका कुठे आहे आणि या देशाची खासियत काय आहे जाणून घेऊया.

यंदाच्या फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच ४८ संघ खेळवले जात आहेत. या ४८ संघांमध्ये बरेचसे असे देश आहेत, ज्यांची नावदेखील आपण फार कमी वेळेस ऐकली आहेत आणि जगाच्या नकाशावर देखील यापैकी काही देशांचा उल्लेख सहसा आढळत नाही. तसाच एक देश आहे केप व्हर्डे.

फिफा विश्वचषकात गाजत असलेला केप व्हर्डे देश नेमका कुठे आहे?

नैसर्गिक संसाधनांची कमतरता, वारंवार पडणारे दुष्काळ आणि अत्यल्प शेतीयोग्य जमीन असूनही केप व्हर्डेने राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचं आदर्श उदाहरण म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पोर्तुगालची वसाहत असलेल्या या देशात १० बेटे आणि ५ लहान बेटांचा समावेश आहे. यापैकी केवळ तीन बेटे वगळता उर्वरित सर्व बेटे डोंगराळ आहेत. हा द्वीपसमूह आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर अटलांटिक महासागरात वसलेला आहे.

केप व्हर्डे देशाला काबो व्हर्डे असंही म्हटलं जातं. एकेकाळी केप व्हर्डे हे गुलामांच्या व्यापाराचं महत्त्वाचे केंद्र मानलं जात होतं. मात्र २०व्या शतकात भीषण दुष्काळांचा देशाला मोठा फटका बसला. या दुष्काळांमुळे सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून आलं. आज परिस्थिती अशी आहे की केप व्हर्डेच्या मूळ लोकसंख्येपेक्षा अधिक लोक देशाबाहेर वास्तव्यास आहेत. परदेशात राहणारे हे नागरिक आपल्या कुटुंबियांना पाठवणाऱ्या पैशांमुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते आणि अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा आधार मिळतो.

केप व्हर्डे देशाबाबत महत्त्वाची माहिती

राजधानी – प्राया
क्षेत्रफळ: ४,०३३ चौरस किमी.
लोकसंख्या: सुमारे ५.६२ लाख
भाषा: पोर्तुगीज आणि केप व्हेर्डियन क्रिओल
सरासरी आयुर्मान: पुरुष ६९ वर्षे, महिला ७७ वर्षे
राष्ट्राध्यक्ष: जोसे मारिया नेव्हिस

वृत्तपत्रे
आ नासाओ (A Nação) – साप्ताहिक वृत्तपत्र
एक्सप्रेसो दास इल्हास (Expresso das Ilhas) – साप्ताहिक वृत्तपत्र
आ सेमाना (A Semana) – साप्ताहिक वृत्तपत्र

World Map With Countries
जगाचा नकाशा (फोटो -@mapsofindia.com)

केप व्हर्डेच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना

१४६२ – पोर्तुगीज वसाहतकारांनी सॅंटियागो बेटावर पाऊल ठेवलं. युरोपियन्सच्या आगमनापूर्वी ही बेटे निर्जन होती. त्यानंतर केप व्हर्डे हे बंदुका, रम आणि कापड यांसारख्या स्वस्त वस्तूंच्या व्यापाराचे केंद्र बनले आणि अटलांटिक महासागरातील गुलाम व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावू लागले.

१४९५ – केप व्हर्डेला पोर्तुगालच्या राजसत्तेची अधिकृत वसाहत (क्राउन कॉलनी) म्हणून दर्जा मिळाला.

१९५६ – केप व्हर्डेचे रहिवासी अमिलकार काब्राल यांनी गिनी-बिसाऊमध्ये गिनी आणि केप व्हर्डे स्वातंत्र्य आफ्रिकन पक्ष (PAIGC) ची सह-स्थापना केली.

१९६० – अनेक केप व्हर्डेवासी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गिनी-बिसाऊमध्ये सुरू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. या संघर्षाचे नेतृत्व PAIGC पक्षाकडे होते.

१९७५ – केप व्हर्डेला स्वातंत्र्य मिळाले. नव्या संविधानात गिनी-बिसाऊसोबत एकत्रित राष्ट्र निर्माण करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

१९८० – गिनी-बिसाऊमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर केप व्हर्डेने दोन्ही देशांच्या एकीकरणाची योजना रद्द केली.

१९८१ – केप व्हर्डे स्वातंत्र्य आफ्रिकन पक्ष (PAICV) ने PAIGC ची जागा घेतली आणि देशातील एकमेव राजकीय पक्ष बनला.

१९९२ – नव्या संविधानाद्वारे बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था लागू करण्यात आली.

२००७ – World Trade Organization च्या परिषदेनं केप व्हर्डेच्या संघटनेतील प्रवेशाला मंजुरी दिली.

२०१३ – सरकारने देशाचे अधिकृत पोर्तुगीज नाव “काबो व्हेर्डे” (Cabo Verde) इतर भाषांमध्येही वापरण्याची विनंती केली. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर “Cape Verde” ऐवजी “Cabo Verde” या नावाचा अधिकृत वापर सुरू झाला.