भारतीय संघ तीन वर्षांपूर्वी आयर्लंडच्या दौऱ्यावर असताना संघव्यवस्थापनाने दीपक हुड्डावर पहिल्या तीन क्रमांकांपैकी एकावर खेळण्याची जबाबदारी सोपवली. दीपकने पहिल्या लढतीत नाबाद ४७ धावांची खेळी केली. हाच फॉर्म कायम राखत दुसऱ्या लढतीत दीपकने तडाखेबंद शतकच साकारलं. दमदार फटकेबाजीचा नमुना असलेल्या या शतकाचं कौतुक झालं होतं. दीपक हुड्डाच्या रुपात भारतीय संघाला उत्तम हिटर, उपयुक्त फिरकीपटू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिळाला असं म्हटलं गेलं. तीन वर्षांनंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. दीपक हुड्डा असा कोणी खेळाडू भारतासाठी खेळला याचा मागमूसही आता राहिलेला नाही.

दीपकने डब्लिनच्या मॅलाहाईड स्टेडियमवर ९ चौकार आणि ६ षटकारांसह ५७ चेंडूत १०४ धावांची सुरेख खेळी साकारली. दीपक आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूत १७६ धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारली होती. या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यामुळेच दीपकला अंतिम अकरात स्थान मिळालं. दीपकचं शतक आणि संजूच्या ७७ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २२५ धावा केल्या. आयर्लंडने हार न मानता २२१ धावांची मजल मारली.

भारतीय संघाने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. दीपकला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. हरिकेन हुड्डा अशी बिरुदावली त्याला मिळाली होती. आयपीएल स्पर्धेत दीपक राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्स संघांकडून खेळला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चारदिवसीय प्रकारात दीपकच्या नावावर २९३ धावांची दिमाखदार खेळी आहे. बडोद्याकडून खेळताना कर्णधार कृणाल पंड्याशी त्याचा वाद झाला होता. यानंतर तो राजस्थानकडून खेळू लागला. आयपीएलमध्ये मात्र तो आणि कृणाल लखनौ संघात एकत्र होते.

दीपक त्यानंतर भारतीय संघासाठी दोन वर्षात १६ टी२० सामने खेळला. मात्र आयर्लंडविरुद्ध जशी त्याची कामगिरी झाली तसं त्याला खेळता आलं नाही. याच कालावधीत दीपक भारतासाठी १० वनडे खेळला. मात्र त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. गोलंदाजीतही मोठं योगदान देता आलं नाही.

२०२४ मध्ये दीपकने खासगी समारंभात गर्लफ्रेंडशी लग्न केलं होतं. टी२० क्रिकेटचा इतका प्रदीर्घ अनुभव असूनही या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात कोणत्याच संघाने त्याला ताफ्यात घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. दीपकने आयपीएल स्पर्धेत १२५ सामन्यात १४९६ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर १० विकेट्सही आहेत.