Rohit sharma replacement in MI Playing XI: मुंबई इंडियन्सला त्यांच्या पुढील सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. मुंबई पंजाब किंग्सविरुद्ध स्पर्धेतील पुढील सामना खेळणार असून, मुंबई इंडियन्सचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. आरसीबीविरुद्धच्या मागील सामन्यात रोहितला फलंदाजी करत असताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला सामना सुरू असतानाच रिटायर्ड हर्ट होत माघारी परताव लागलं. आता रोहित शर्मा जर पंजाबविरूद्धचा सामना खेळला नाही तर कोणते खेळाडू त्याला रिप्लेस करू शकतात, जाणून घेऊया

रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पुन्हा मैदानावर उतरला नाही आणि मुंबईने आरसीबीविरूद्धचा तो सामनादेखील गमावला. रोहित शर्मा यानंतर दुखापतीसाठी स्कॅन करण्याकरताही गेला होता. याशिवाय पंजाब किंग्सविरूद्ध सामन्याच्या आदल्या दिवशी रोहित काही फिटनेस ड्रील करताना दिसला. रोहितच्य या फिटनेस ड्रीलचा आणि त्याच्या स्कॅनचे रिपोर्ट्स लक्षात घेऊन तो या सामन्यात खेळणार की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.

रोहित शर्माला कोणते ३ खेळाडू प्लेईंग इलेव्हनमध्ये रिप्लेस करू शकतात?

क्विंटन डी कॉक

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माच्या जागी सलामी देण्यासाठी क्विंटन डी कॉक हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्याला आयपीएलचा दांडगा अनुभव असून त्याने या स्पर्धेत ३,३०० हून अधिक धावा केल्या आहेत. डी कॉक त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ३३ वर्षीय डी कॉकने आयपीएलमध्ये अनेक फ्रँचायझींकडून खेळताना गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. मात्र, त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करण्यासाठी विदेशी खेळाडूंच्या संयोजनात संघाला बदल करावा लागेल. डी कॉकला सामावून घेण्यासाठी मिचेल सँटनर किंवा ट्रेंट बोल्ट यांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

नमन धीर

रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात करू शकणारा आणखी एक खेळाडू म्हणजे नमन धीर. गेल्या सामन्यात नमन धीर मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, त्यामुळे या सामन्यातही त्याचा समावेश होऊ शकतो. गरज पडल्यास तो डावाची सुरुवातही करू शकतो. या २६ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत २७ आयपीएल सामने खेळले असून, १७६ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ४५१ धावा केल्या आहेत. तो पंजाब किंग्सच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्धही चांगली फलंदाजी करू शकतो.

रॉबिन मिन्ज

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स रोहितच्या जागी रॉबिन मिन्झला संधी देऊ शकते. मिन्झला आयपीएलचा फारसा अनुभव नाही, पण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्सने त्याला ३.६० कोटी रुपयांना विकत घेतलं आणि नंतर आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ६५ लाख रुपयांना ताफ्यात सामील केलं. मिन्झने आतापर्यंत फक्त सात टी०२० सामने खेळले असल्याने त्याला फारशा संधी मिळालेल्या नाहीत.