Vaibhav Sooryavanshi Bid In IPL: वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेत तुफान चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल स्पर्धेतील लिलावात हिरा शोधून काढला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी त्याला राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या संघात घेण्यासाठी १.१० कोटी रूपये मोजले जेली. ज्यावेळी त्यांनी हा डाव टाकला त्यावेळी कोणालाच विश्वास बसत नव्हता. कारण १३ वर्षांच्या मुलासाठी कोटी रुपये मोजणं हे काही लोकांना पटलं नव्हतं. पण आता वैभव सूर्यवंशी पुन्हा लिलावात दिसण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. वैभव लिलावात येण्याआधी अंडर १९ संघासाठी केवळ १ कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला होता. या कामगिरीवरुन त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी राजस्थान रॉयल्सने पूर्ण जोर लावला. पण राजस्थान रॉयल्ससह आणखी कोणत्या संघाने त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी बोली लावली होती? जाणून घ्या.
वैभव सूर्यवंशीवर बोली लावणारा संघ दुसरा तिसरा कोणता संघ नसून दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी जेव्हा लिलाव झाला, त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाला सलामीवीर फलंदाजाची गरज होती. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत ३० लाख रुपये इतकी होती. सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला संघात स्थान देण्यासाठी हात उंचावला. त्यानंतर मग राजस्थान रॉयल्स संघाने बोली लावली.
ज्यावेळी वैभव सूर्यवंशी लिलावात आला त्यावेळी तो अवघ्या १३ वर्षांचा होता. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी बोली लावायला सुरुवात केली. दिल्लीने १ कोटी रुपयांपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर सोडून दिलं, त्यामुळे वैभव सूर्यवंशी सारखा स्टार फलंदाज राजस्थान रॉयल्स संघात अवघ्या १.१० कोटी रुपयात दाखल झाला.
राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यासाठी १० कोटी रुपये बाजूला काढून ठेवले होते. पण कुठल्याच संघाने त्याचा इतका पाठलाग केला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला तो कमी किमतीत मिळाला. त्यावेळी राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. युवा खेळाडूंना कसं शोधून काढायचं आणि त्यांना मोठं कसं करायचं हे राहुल द्रविड यांना चांगलंच माहीत आहे. वैभव सूर्यवंशीला संघात तर स्थान दिलं होतं, पण सुरूवातीला त्याला संधी दिली गेली नव्हती. त्यानंतर संधी मिळताच त्याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला होता. त्यानंतर गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३५ चेंडूत वेगवान शतक झळकावलं होतं.
