श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात जम्मू काश्मीरच्या आकिब नबीची निवड झाली आहे. रणजी करंडक स्पर्धेत अफलातून कामगिरी करणाऱ्या नबीला मूळ संघात स्थान न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी होती. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने नबीचा समावेश करण्यात आला आहे.

२९वर्षीय नबीने गेल्या दोन रणजी हंगामात १०४ विकेट्स पटकावल्या आहेत. २०२५-२६ हंगामात नबीने ६०पेक्षा जास्त विकेट्स घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणलं. जम्मू काश्मीरला पहिलंवहिलं रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद पटकावून देण्यात नबीचा सिंहाचा वाटा होता. अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केलेल्या भारतीय अ संघांचा तो भाग होता. नबीने श्रीलंका दौऱ्यात पदार्पण केल्यास जम्मू काश्मीरचा भारतासाठी खेळणारा तो पहिला कसोटी क्रिकेटपटू असेल.

याआधी परवेझ रसूल आणि उमरान अकमल हे दोघे भारतासाठी खेळले होते. मात्र भारतीय संघात प्रवेशासाठी असलेल्या प्रचंड चुरशीत हे दोघे हरवून गेले. हे दोघं सध्या काय करतात? असा प्रश्न चाहत्यांना पडणं साहजिक आहे. जम्मू काश्मीरचे माजी प्रशिक्षक बिशन सिंग बेदी यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या परवेझ रसूलने २०१२-१३ रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावल्या होत्या. ७ रणजी सामन्यात रसूलने ५९४ धावांसह ३३ विकेट्स पटकावल्या होत्या. तो आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स संघाचाही भाग होता. त्याचवर्षी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध बोर्ड प्रेसिडेंट संघाकडून खेळताना त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या परवेझला २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध पदार्पणाची संधी देण्यात आली.

१५ जून रोजी मीरपूर इथे झालेल्या लढतीत बांगलादेशने २७२ धावांची मजल मारली. बांगलादेशतर्फे मुशफकीर रहीम, शकीब अल हसन यांनी अर्धशतकी खेळी केल्या. उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. परवेझच्या १० षटकात ६० धावा बांगलादेशने वसूल केल्या मात्र त्याने २ विकेट्स घेतल्या. अनामूल हकला बाद करत रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिलीवहिली विकेट पटकावली. त्याने बांगलादेशचा कर्णधार मुशफकीर रहीमलाही बाद केलं. भारतीय संघाने डकवर्थ लुईस पद्धतीने दिलेलं सुधारित लक्ष्य गाठलं. रॉबिन उथप्पा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारल्या. रहाणेला अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पदार्पणात चांगली कामगिरी करूनही रसूलला पुन्हा भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना वेगवान गोलंदाज उमरान मलिकने ताशी दीडशे किमी वेगाने चेंडू टाकला. टेनिस बॉल स्पर्धांच्या माध्यमातून उमरानने स्वत:ला गोलंदाज म्हणून विकसित केलं. आयपीएलच्या २०२२ हंगामात उमरानने २२ विकेट्स घेतल्या. त्याचवर्षी उमरानने भारतासाठी वनडे आणि टी२० पदार्पण केलं. उमरानने १० वनडे आणि ८ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या नावावर २४ विकेट्स आहेत. फक्त वेगाच्या बळावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावता येणार नाही हे स्पष्ट झालं. उमरानला दुखापतींनीही सतावलं. त्यामुळे त्याच्या डोमेस्टिक क्रिकेट खेळण्यावरही मर्यादा आल्या. रसूलच्या तुलनेत उमरानला भारतासाठी आणखी काही सामने खेळता आले. मात्र प्रतिस्पर्धी संघांनी त्याचे कच्चे दुवे हेरले आणि त्याच्या गोलंदाजीवर धावा वसूल करायला सुरुवात केली. भारताचा ब्रेट ली असं वर्णन झालेल्या उमरानला तूर्तास तरी

नबीला रसूल आणि उमरान यांच्या तुलनेत अधिक संधी मिळाव्यात असं चाहत्यांना वाटतं. मात्र भारतीय संघात प्रत्येक जागेसाठी असलेली चुरस पाहता नबीला प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करावं लागेल हे नक्की. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने नबीला ताफ्यात घेत त्याच्यावर विश्वास ठेवला होता. भारतीय संघव्यवस्थापन त्याच्यावर किती विश्वास ठेवतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.