भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत किवी संघाचा नवखा संघ आला आहे. पहिल्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ३०० धावांचा डोंगर उभारला आहे. यानंतर भारत लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या खेम्यात भारतीय वंशाचा खेळाडू गोलंदाजी करताना दिसत आहे. फिरकीपटू आदित्य अशोक कोण आहे, जाणून घेऊया.

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय वंशाचा खेळाडू आदित्य अशोकला मैदानात उतरवलं आहे. या खेळाडूचा हा पहिला एकदिवसीय सामना होता. आदित्य अशोक हा एक गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी दोन एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला आहे. २०२० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकादरम्यान तो प्रकाशझोतात आला. जून २०२५ मध्ये न्यूझीलंड क्रिकेटने त्याला पहिल्यांदाच केंद्रीय करारात समाविष्ट केलं.

आदित्य हा एक लेग स्पिनर आहे, जो चेंडू टर्न आणि स्किड करण्यासाठी ओळखला जातो. त्याने २०२० च्या अंडर-१९ विश्वचषकात आपली छाप पाडली. ईश सोधी आणि एजाज पटेल यांच्यानंतर किवी संघाचा पुढचा फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. काही वर्षांपूर्वीच तो संघातील नियमित खेळाडू दिसला असता, परंतु पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या कारकीर्दीला ब्रेक लागला असता. डिसेंबर २०२३ नंतर तो एक वर्ष खेळू शकला नाही.

आदित्य हा मूळचा तामिळनाडूतील वेल्लोर येथील आहे. तो चार वर्षांचा असताना त्याचे आई-वडिल न्यूझीलंडमध्ये शिफ्ट झाले आणि ऑकलंडमध्ये स्थायिक झाले. त्याचे वडील स्टारशिप हॉस्पिटलमध्ये रेडिओग्राफीमध्ये आहेत आणि आई सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. आदित्यचे वडील देखील माजी क्रिकेटपटू होते. आदित्यने ऑकलंडमधील शालेय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.

गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या आदित्यने चेन्नईतील सुपर किंग्ज अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलं, जिथे त्याने त्याच्या फिरकी गोलंदाजीवर काम केलं. त्याला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी मिळण्याची आशा आहे. आदित्य हा रजनीकांतचा चाहता आहे.

आदित्यने रजनीकांतच्या ‘पडयप्पा’ चित्रपटातील एक डायलॉग त्याच्या गोलंदाजी करणाऱ्या हातावर लिहिला आहे. त्याच्या टॅटूमध्ये त्याने “एन वाझी थानी वाझी” असे शब्द कोरलेले आहेत, ज्याचा अर्थ “माझी शैली वेगळी आहे.” आदित्य या टॅटूद्वारे तामिळनाडूशी त्याची नाळ जोडलेली आहे, हे दिसून येत आहे. तसेच रजनीकांतबद्दलचा त्याचा आदर देखील पाहायला मिळतो.

आदित्यने आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७८ विकेट्स घेतल्या आहेत आणि ३५९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३९ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५२ विकेट्स आणि २८२ धावा केल्या आहेत आणि ३२ टी-२० सामन्यांमध्ये ३१ विकेट्स आणि ६१ धावा केल्या आहेत.