Who Is Akash Kumar Chaudhary: भारतात रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक मोठे विक्रम बनवले जात आहेत. ९ नोव्हेंबरला या विक्रमांच्या यादीत आणखी एका मोठ्या विक्रमाची भर पडली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेघालय संघाकडून खेळणाऱ्या आकाश कुमार चौधरीने विश्वविक्रमी खेळी केली आहे. प्लेट डिव्हिजन सामन्यात अरुणाचल प्रदेश संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने लागोपाठ ८ षटकार खेचले. दरम्यान अरुणाचल प्रदेश संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत त्याने अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावून, सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. दरम्यान आकाश कुमार चौधरी आहे तरी कोण? जाणून घ्या.

आकाश कुमार चौधरी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागोपाठ ८ षटकार मारून आणि सर्वात जलद अर्धशतकी खेळी करून चर्चेत आला आहे. २५ वर्षीय आकाशला २०१९ मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३० सामने, लिस्ट ए क्रिकेटमध्ये २८ खेळण्याची संधी मिळाली आहे. तर ३० टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान गोलंदाजी करताना त्याच्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८७ गडी बाद करण्याची नोंद आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ आणि टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने २८ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ५०३ गडी बाद करण्याची नोंद आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २०३ आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १०७ धावा केल्या आहेत.

आकाश उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने अनेकदा गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान दिलं आहे. याआधी झाली झालेल्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्यावेळी त्याने बिहारविरूद्ध झालेल्या सामन्यात ५ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६० धावांची खेळी केली होती. दरम्यान गोलंदाजी करताना त्याने ४० धावा खर्च करून ७ गडी देखील बाद केले होते. यासह त्याला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ ईस्ट झोन संघाकडून खेळण्याची देखील संधी मिळाली आहे.

एकाच डावात मोडून काढले मोठे विक्रम

आकाश कुमार चौधरी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.
यासह रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आकाश कुमार चौधरीच्या नावे नोंदवला गेला आहे.
यासह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात लागोपाठ ६ षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी रवी शास्त्री आणि गॅरी सोबर्स यांनी देखील एकाच षटकात ६ षटकार मारले होते.
यासह रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एकाच षटकात ६ षटकार मारणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर होता.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ ८ षटकार मारणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.