Who Is Auqib Nabi Dar: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ८ वेळचा चॅम्पियन असलेल्या कर्नाटक संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण जम्मू- काश्मीर संघाने पहिल्या दिवसापासून सामन्यावर मजबूत पकड बनवून ठेवली. पहिल्या डावात फलंदाजी करताना जम्मू-काश्मीर संघाने ५८४ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटकचा डाव अवघ्या २९३ धावांवर आटोपला. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जम्मू-काश्मीर संघाने ४ गडी बाद ३४२ धावा केल्या आणि डाव घोषित केला. शेवटी दोन्ही कर्णधारांनी हात मिळवण्याचा निर्णय घेतला. यासह जम्मू-काश्मीर संघाने ६७ वर्षांनंतर जेतेपदाचा मान पटकावला.
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे ११ खेळाडूंनी योगदान दिल्याशिवाय कुठलाही सामना जिंकता येत नाही. पण या ११ पैकी एका खेळाडूकडून अशी कामगिरी अपेक्षित असते, जी इतर १० खेळाडूंची जागा भरून काढेल. या संपूर्ण स्पर्धेत जम्मू-काश्मीर संघातील वेगवान गोलंदाज आकिब नबीच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. नबीने या हंगामात गोलंदाजी करताना सर्वाधिक ६० गडी बाद केले. यासह तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी राहिला. यासह त्याची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. कर्नाटक संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातही गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले.
कोण आहे आकिब नबी डार?
आकिब नबी डार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीर संघाचं प्रतिनिधित्व करतो. आकिब नबीचा जन्म उत्तर काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील शीरी गावात झाला. आकिब नबीला स्टेन गन ऑफ बारामूला असं म्हटलं जातं. आकिब नबी आपल्या गोलंदाजीतील गतीसाठी ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन देखील भन्नाट वेगाने अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्यासाठी ओळखला जायचा. आकिब नबीच्या गोलंदाजीतही ती धार पाहायला मिळते. त्यामुळे त्याला हे टोपण नाव देण्यात आलं आहे.
गोलंदाजीत अव्वल असलेला आकिब नबी अभ्यासातही पुढे होता. आपल्या मुलाने डॉक्टर बनाव असं त्याच्या वडिलांचं स्वप्नं होतं. पण १२ वी झाल्यानंतर त्याने क्रिकेटवर अधिक भर दिला. आगामी आयपीएल २०२६ स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर ८.४० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे.
