Chad Laycock 5 Wickets in One Over CSA T20 Challenge: क्रिकेटच्या मैदानावर एका षटकात ६ षटकार, २ विकेट्स, ३ विकेट्स हे समीकरण आपण ऐकलं आहे. पण चॅड लेकॉक नावाच्या गोलंदाजाने १ षटकात ५ विकेट्स घेत जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये जिथे चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे, तिथे या गोलंदाजाने विकेट्सची रांग लावली. एका षटकात ५ विकेट्स घेणारा हा गोलंदाज कोण आहे, जाणून घेऊया.
कोण आहे एका ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेणारा चॅड लेकॉक?
चॅड लेकॉक हा दक्षिण आफ्रिकेचा एक वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. ‘सीएसए टी२० चॅलेंज’ (CSA T20 Challenge) स्पर्धेत, ‘क्वाझुलु-नाताल इनलँड टस्कर्स’ (KwaZulu-Natal Inland Tuskers) कडून खेळताना टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच षटकात ५ बळी घेत खळबळ उडवून दिली होती. या नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या चॅडला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे.
क्वाझुलु-नाताल क्रिकेट क्षेत्रातील या अष्टपैलू खेळाडूने डर्बनमधील ग्लेनवुड हायस्कूलमध्येच क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरूवात केली; तिथे इयत्ता दहावीत असतानाच त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास सुरूवात केली होती.
२०१९ मध्ये, लेकॉकने क्रिकेट एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत आयर्लंडमधील रेल्वे युनियन क्रिकेट क्लबकडून खेळला होता. क्लबच्या मुख्य संघात खेळताना त्याने ३४१ धावा केल्या आणि १८ बळी मिळवत प्रभावी कामगिरी केली. याव्यतिरिक्त, त्याने क्लबच्या १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघांसाठी शतकं झळकावली, तसेच एका षटकात सहा षटकार मारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
क्वाझुलु-नाताल (KwaZulu-Natal) संघासाठी चॅड लेकॉकने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २६ धावा देऊन ६ बळी घेतले, ज्यामध्ये एकाच षटकात ५ बळींचा समावेश होता. या कामगिरीसह, पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात ५ बळी घेणारा लेकॉक केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे. त्या एका षटकात त्याने केवळ २ धावा दिल्या होत्या.
त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक बळी मिळवला. त्यानंतर फलंदाजाने दुसऱ्या चेंडूवर २ धावा काढल्या, परंतु त्यानंतर लेकॉकने सलग चार बळी घेत ‘डबल हॅट्ट्रिक’ पूर्ण केली. जेव्हा एखादा गोलंदाज सलग चार चेंडूंवर चार बळी घेतो, तेव्हा त्याला ‘डबल हॅट्ट्रिक’ असं म्हणतात.
