IPL 2026 Who is Cooper Conolly PBKS Debutant: पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२६ सामन्यात एक नवा खेळाडू नावारूपाला आला. पंजाब किंग्सचा संघ गुजरातविरूद्ध एका टोकाकडून लागोपाठ विकेट्स गमावत होता, पण २२ वर्षीय या फलंदाजाने न डगमगता संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. विशेष म्हणजे या २२ वर्षीय फलंदाजाचा या मोठ्या लीगमधील पहिलाच पदार्पणाचा सामना होता. पंजाब किंग्सला पदार्पणात एकहाती विजय मिळवून देणारा कुपर कॉनोली कोण आहे, जाणून घेऊया.

२२ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कुपर कॉनोलीने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आपल्या आयपीएल पदार्पणातच, कुपरने सामना जिंकून देणारी खेळी करून पंजाब किंग्सला रोमांचक विजय मिळवून दिला. मुल्लानपूर येथील सामन्यात, कॉनोलीने ४४ चेंडूंमध्ये ७२ धावांची नाबाद शानदार खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या या मॅचविनिंग खेळीसह पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून विजय मिळवून दिला.

कॉनोलीच्या मॅचविनिंग खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आयपीएल २०२६ च्या लिलावात पंजाब किंग्सने त्याला ३ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. गुजरात टायटन्सच्या १६२ धावांचा पाठलाग करताना, कर्णधार अय्यरने कुपरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. कॉनोलीने या संधीचं सोनं करत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. त्याने ३४ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून त्याने सामना संपवला.

PBKS vs GT: कोण आहे कुपर कॉनोली? (Who is Cooper Conolly)

कुपर कॉनोली हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. जो डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू आहे. कॉनोलीने २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. उत्तम फलंदाज असूनही वनडेमध्ये पाच विकेट्स घेणारा तो ऑस्ट्रेलियाचा सर्वात तरूण खेळाडू आहे. कॉनोलीने २०२२ च्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्त्वही केलं आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांसाठी ग्लेन मॅक्सवेलचा दीर्घकालीन पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं. मॅक्सवेलप्रमाणेच, कॉनोली एक आक्रमक फलंदाज आहे आणि तो आपल्या फिरकी गोलंदाजीनेही योगदान देतो. कॉनोली ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार खेळाडू शॉन मार्शला आपला आदर्श मानतो. आयपीएल पदार्पणापूर्वी, कॉनोलीने ५२ टी-२० सामने खेळून ८७० धावा केल्या आहेत आणि ३० बळीदेखील त्याच्या नावे आहेत.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या कॉनोलीने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पणही केलं आहे. त्याने एक कसोटी, आठ एकदिवसीय आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने ७ सप्टेंबर २०२४ रोजी स्कॉटलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि त्याने एकमेव कसोटी सामना २०२५ मध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याने कसोटीत ४ बळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ धावा आणि ६ बळी, तर टी-२० सामन्यांमध्ये २८ धावा आणि ३ बळी घेतले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकासाठीच्या ऑस्ट्रेलियाच्या संघातही कॉनोलीचा समावेश होता, मात्र त्याला त्यात फारसे यश मिळाले नाही.