IPL 2026 Who is David Payne: आयपीएल २०२६ पूर्वी अनेक संघांना दुखापतींचा फटका बसला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बरेच खेळाडू बाहेर झाले आहेत आणि या खेळाडूंच्या जागी संघाने बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने दुखापतग्रस्त खेळाडू जॅक एडवर्ड्सच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. जॅक एडवर्ड्सला हैदराबादने ३ कोटींना संघात दाखल केलं होतं, त्याच्याजागी आलेला नवा खेळाडू डेव्हिड पेन कोण आहे जाणून घेऊया.

सनरायझर्स हैदराबाद संघाला ३ कोटींना खरेदी केलेल्या जॅक एडवर्ड्सच्या दुखापतीच्या रूपात मोठा फटका बसला आहे. २८ मार्चला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्धच्या सामन्याने सनरायझर्स हैदराबाद आपल्या मोहिमेला सुरूवात करेल. पहिल्या सामन्यापूर्वी SRH ने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड पेन याला बदली खेळाडू म्हणून संघात सामील केलं आहे. पेनला १.५ कोटींना करारबद्ध करण्यात आलं आहे.

कोण आहे डेव्हिड पेन?

डेव्हिड अॅलन पेन हा इंग्लंडचा डावखुरा bsibev गोलंदाज आहे. त्याने २००९ साली ग्लॉस्टरशायरकडून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने इंग्लंडच्या अंडर-१९ संघाकडून कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळे आहेत. याशिवाय अंडर-१९ वर्ल्डकप २०१० साठी त्याची संघात निवड करण्यात आली होती.

३५ वर्षीय पेनने इंग्लंडसाठी एकच वनडे सामना खेळला आहे. त्याने आतापर्यंत कारकिर्दीत २३३ टी-२० सामने खेळत ३०४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकमेव आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळला होता, ज्यात त्याने डेव्हिड विलीसोबत नवी चेंडू टाकत एक विकेट घेतली होती. टी-२० क्रिकेटमध्ये तो ग्लॉस्टरशायरचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. २०२४ च्या टी-२० ब्लास्ट स्पर्धेत त्याने १७ डावांत ३३ विकेट्स घेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

याशिवाय, तो द हंड्रेड स्पर्धेत वेल्श फायर संघाकडून खेळला आहे. बिग बॅश लीगमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. २०२५-२६ हंगामातील फायनलमध्ये पर्थ स्कॉर्चर्ससाठी १८ चेंडूत ३ विकेट्स अशी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता आणि संघाला सहावं विजेतेपद मिळवून दिलं. तसेच, आयएल टी-२० स्पर्धेत डेजर्ट वायपर्सकडून तो दोन हंगाम खेळला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून इशान किशन संघाचं नेतृत्त्व करणार आहे.