Mumbai vs Uttarakhand Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध ९४ चेंडूत १५५ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीसह रोहित मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातली रोहितची खेळी पाहण्यासाठी चाहत्यांनी जयपूरमध्ये तुफान गर्दी केली होती. पण रोहित शर्मा मात्र दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. उत्तराखंडविरूद्ध सामन्यात देवेंद्र सिंग बोराने त्याला शून्यावर बाद केलं.
उत्तराखंडने मुंबईविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्मा व अंगक्रिश रघुवंशी ही जोडी सलामीला उतरली. पण मुंबईच्या डावातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद झाला. उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज देवेंद्र सिंग बोराने त्याला बाद करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बोराने चांगल्या लाईन व लेंग्थसह हा चेंडू टाकला होता आणि रोहित पहिल्याच चेंडूवर पिक अप पूल शॉट खेळला.
रोहित शर्माच्या शॉटचा टायमिंग चुकला आणि सीमारेषेच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. जगमोहन नागरकोटीने डीप फाइन लेगवर रोहितचा झेल घेतला. पहिल्या प्रयत्नात, नागकोटीकडून चेंडू घसरला, पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने चेंडू टिपला.
कोण आहे देवेंद्र सिंग बोरा?
रोहित शर्माची ही विकेट २५ वर्षीय देवेंद्र सिंग बोरासाठी खूप खास होती. त्याने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्माला बाद केलं होतं. रोहितला बाद केल्यानंतर देवेंद्र चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, मागील सामन्यात शानदार शतक झळकावल्यानंतर रोहित उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याला बाद करणं उत्तराखंड संघासमोर मोठं लक्ष्य होतं.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज देवेंद्र सिंग बोरा त्याच्या कारकिर्दीतील फक्त तिसरा लिस्ट ए सामना खेळत आहे. रोहित शर्माला बाद करत त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील पाचवा बळी घेतला. बोरा हा उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे. देवेंद्र सिंगने २०२४ मध्ये पुद्दुचेरीविरूद्ध सामन्यात उत्तराखंडसाठी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
देवेंद्र सिंग बोराने हिमाचल प्रदेशविरुद्ध ४४ धावांत चार विकेट्स घेतल्या आणि २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात दमदार सुरूवात केली. आतापर्यंत त्याने उत्तराखंडसाठी १५ सामन्यांमध्ये ३० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ४१.१३ आणि स्ट्राईक रेट ६९.७ आहे. देवेंद्र बोराने यापूर्वी उत्तराखंड प्रीमियर लीग (यूपीएल) २०२५ मध्ये चांगली कामगिरी केली होती. तो डेहराडून वॉरियर्स संघाचा भाग आहे. यामध्ये त्याने ६ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या होत्या.
