टी२० वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानाव फिन अॅलन नावाचं वादळ घोंघावलं. या वादळात दक्षिण आफ्रिकेचा संघ नेस्तनाबूत झाला. अॅलनने अवघ्या ३३ चेंडूत शतकाला गवसणी घालत अनेक विक्रम नोंदवले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवत फायनलमध्ये धडक मारली.
२६वर्षीय उंचपुरा अॅलन ताकदीच्या बळावर अचंबित करणारे फटके लगावतो. कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी तसंच मार्को यान्सन या दर्जेदार आक्रमणाविरुद्ध खेळताना अॅलनने भात्यातले सगळी शस्त्रं परजली. स्टंप्सच्या अक्रॉस जाऊन फाईनलेग क्षेत्रात षटकार खेचण्याचं त्याचं कसब विलक्षण आहे.
२०२१ मध्ये अॅलनने न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं. ६१ टी२० सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करताना अॅलनने १७१.०४च्या स्ट्राईकरेटने १६५४ धावा केल्या असून यामध्ये ३ शतकं आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. पदार्पणात भोपळाही फोडू न शकणाऱ्या अॅलनने ११व्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध शतक झळकावलं होतं. २०२४ मध्ये अॅलनने ड्युनेडिन इथे पाकिस्तानविरुद्ध ९४ चेंडूत १६ षटकार आणि ५ चौकारांसह १३७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.
आयपीएल प्रवास
फेब्रुवारी २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अॅलनला संघात समाविष्ट केलं. जोश फिलीप वैयक्तिक कारणास्तव संपूर्ण हंगाम खेळू शकणार नसल्याने बंगळुरूने अॅलनचा समावेश केला. लिलावात अॅलन अनसोल्ड गेला होता. फलंदाजीप्रमाणे यष्टीरक्षणही करू शकत असल्याने फिलीपला लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून अॅलनला प्राधान्य देण्यात आलं. अॅलनने न्यूझीलंडमधल्या सुपर स्मॅश स्पर्धेच्या २०२०-२१ हंगामात ५१२ धावा केल्या होत्या. यामध्ये २५ षटकारांचा समावेश होता
अॅलनला अंतिम अकरात स्थान मिळू शकलं नाही मात्र विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यासारख्या मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मोलाचा होता असं अॅलनने क्रिकबझ संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं.
यंदाच्या हंगामात अॅलन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. २ कोटी बेस प्राईजलाच कोलकाताने अॅलनला ताफ्यात समाविष्ट केलं. योगायोग म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अॅलन आणि टीम सैफर्ट यांनी झंझावाती सलामी दिली. हे दोघेही कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असणार आहेत. हे दोघे एकत्र खेळायला उतरल्यास बाकी संघांतील गोलंदाजांची डोकेदुखी वाढू शकते.
अन्य टी२० लीगमधली वाटचाल
अमेरिकेत आयोजित मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत अॅलनने सॅन फ्रान्सिको युनिकॉर्न्स संघाकडून खेळताना ५२ चेंडूत १५१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती. या खेळीदरम्यान अॅलनने १९ षटकार चोपले होते. बर्मिंगहॅम फोनेक्स, सदर्न ब्रेव्ह, पर्थ स्क्रॉचर्स, क्वेटा ग्लॅडिएटर्स अशा विविध संघांकडून खेळतो.
टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी नाकारला न्यूझीलंड बोर्डाचा करार
जगभरात आयोजित टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी अॅलनने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध होणं टाळलं. अॅलन न्यूझीलंडकडून खेळतो मात्र प्रत्येक मालिकेपूर्वी तो उपलब्धता निवडसमितीला कळवतो. उपलब्ध असल्यास त्याची संघात निवड होते. करारबद्ध नसल्याने न्यूझीलंडचा प्रत्येक सामना खेळणं त्याच्यासाठी अनिवार्य नाही.
