Who Is Gulveer Singh: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत धावपटू गुलवीर सिंगचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये जिथे एक पदक जिंकणं कठीण असतं, तिथे या पठ्ठ्याने ३ पदकं आपल्या नावावर केले आहेत. १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीरने रौप्य, १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य आणि ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीतही गुलवीरकडे रोप्य पदकाची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. पण त्याने कांस्यपदक जिंकून पदकांची हॅट्रिक पूर्ण केली. यासह पी.टी.उषानंतर एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची हॅट्रिक करणारा दुसराच खेळाडू ठरला.

ट्रॅक इव्हेंटमध्ये गुलवीर जपानमध्ये चमकला. ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत गतविजेता अविनाश साबळेला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण शर्यत सुरू होण्याआधीच त्याने माघार घेतली. त्यामुळे गुलवीर सिंगवर पदक जिंकून देण्याची जबाबदारी होती. या शर्यतीत त्याने शेवटपर्यंत झुंज दिली. बेहेरीन आणि जपानच्या धावपटूंनी शेवटच्या लेगमध्ये गुलवीरला मागे टाकलं. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. याआधी १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीरने रौप्य, १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत देखील रौप्यपदकाची कमाई केली आहे.

कोण आहे गुलवीर?

गुलवीर सिंगचा जन्म १ जून १९८८ ला शेतकरी कुटुंबात झाला. सैन्यात भरती होण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या गुलवीर सिंगला सुरूवातीपासूनच धावण्याची आवड होती. अॅथलेटिक्स हे त्याचं स्वप्न नव्हतं. गुलवीर ज्या गावात राहतो, त्या गावातील जास्तीत लोक हे सैन्यात आहेत. त्यामुळे आधीपासून त्याचं एकच लक्ष्य होतं, ते म्हणजे सैन्यात भरती व्हायचं आणि देशसेवा करायची.

ऑलिम्पिक.कॉमनुसार गुलवीरने इंस्पायर इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई क्रीडा स्पर्धेबाबत फारशी माहिती नव्हती. गावात मोजकीच लोकं होती ज्यांना या स्पर्धेबद्दल माहिती होती.” सुरूवातीला तो फक्त सैन्यात भरती व्हायचंय म्हणून धावायचा. २०१८ मध्ये तो स्पोर्ट्स कोट्यातून सैन्यात भरती झाला. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत गुलवीर म्हणाला होता की, “सैन्यात भरती झाल्यानंतर मला खेळांबद्दल माहिती देण्यात आली आणि सांगण्यात आलं की, जर मी पदक जिंकलो तर माझं प्रमोशन होणार. त्यामुळे मी धावायला सुरूवात केली. मला पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आलं, तिथेच माझी ट्रेनिंग सुरू झाली.”