U19 World Cup 2026 IND vs USA: अंडर-१९ विश्वचषक २०२६ ला आज १५ जानेवारीपासून दणक्यात सुरूवात झाली आहे. बुलावायो येथे स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना अमेरिका अंडर-१९ संघाविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अवघ्या १०७ धावांमध्ये अमेरिकेला सर्वबाद केलं आहे. यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज हेनिल पटेल याने ५ विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, पण हा गोलंदाज नेमका कोण आहे, जाणून घेऊया.

१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात, भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युवा वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने भारताचा निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध करत अमेरिकेच्या टॉप ऑर्डरला माघारी धाडलं. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने फक्त ३९ धावांत ५ विकेट गमावल्या. भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली आणि पहिल्या १० षटकांत फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत.

यानंतर हेनिल पटेलने ३५व्या षटकात दोन विकेट्स घेत आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या. हेनिल पटेलने रोज फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं. तर तिघांना झेलबाद करत विकेट्स मिळवल्या. हेनिलने या सामन्यात ७ षटकांमध्ये १६ धावा देत २.३० च्या इकॉनॉमीने ५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने एक मेडन षटकही टाकलं.

कोण आहे पाच विकेट्स घेणारा हेनिल पटेल?

हेनिल पटेल हा मूळचा गुजरात वलसाड येथील आहे. त्याचा जन्म २८ फेब्रुवारी २००७ मध्ये झाला. हेनिल पटेल हा भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा एक प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. तो त्याच्या अचूक लाईन आणि लेंग्थसाठी आणि चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं.

हेनिलने युवा कसोटीत इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली, ज्यामुळे विश्वचषक संघात त्याचे स्थान पक्कं झालं. हेनिलने गुजरातसाठी देशांतर्गत पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. नवीन चेंडूने विकेट घेण्याची त्याची क्षमता ही त्याची खासियत आहे, जी त्याने आजच्या सामन्यात दाखवून दिली. तो अनेकदा त्याच्या आउटस्विंगर्सने फलंदाजांना त्रास देतो.

हेनिल पटेलच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने अमेरिकेला १०७ धावांवर सर्वबाद केलं. गोलंदाजीशिवाय टीम इंडियाने या सामन्याक कमालीची फिल्डिंग केली आणि एकापेक्षा एक शानदार झेल टिपले, यामुळेच टीम इंडिया अमेरिकेच्या संघाला रोखण्यात यशस्वी ठरली. यासह आता भारताला विजयासाठी १०८ धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे.