Who Is Aditi Hundia: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना जिंकून भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर एकूण तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. यादरम्यान एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत राहिली, ती म्हणजे इशान किशनची गर्लफ्रेंड. इशान किशन आपल्या कथित गर्लफ्रेंडसोबत विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आला. यासह डान्स करताना दिसून आला. दरम्यान अदिती हुंडिया नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या.

इशान किशनला आधी सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याच्या फलंदाजीक्रमात बदल करण्यात आला. इशान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्याच्या फलंदाजी शैलीत कुठलाही बदल झाला नव्हता. पहिल्या चेंडूपासून त्याने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने अर्धशतक झळकावल्यानंतर इशान किशननेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गेल्या काही महिन्यांपासून इशान किशन आणि अदिती हुंडिया हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झालं आहे.

कोण आहे अदिती हुंडिया?

अदिती हुंडिया आधीपासूनच खूप फेमस आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राहणारी अदिती फॅशन मॉडेल आहे. यासह ती युवा उद्योजिका देखील आहे. २०१७ मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्यामुळे तिला खूप लवकर पुढे जाण्याची संधी मिळाली. २०१८ मध्ये तिने मिस डिवा सुपरनॅशनलचा पुरस्कार पटकावला. सध्या ती इशान किशनमुळे चर्चेत आली आहे, पण ती आधीपासूनच आपल्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी अदिती हुंडियाने देखील मैदानात हजेरी लावली होती. इशान किशनच्या प्रत्येक फटक्यावर ती चिअर करताना दिसून आली. इशान किशन आणि अदिती हुंडिया यांच्या नात्याची चर्चा २०१९ मध्ये रंगली होती. आयपीएल सुरू असताना ती इशान किशनला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आली होती. तेव्हापासून ती प्रत्येक सामन्यात इशान किशनला सपोर्ट करण्यासाठी स्टँड्समध्ये हजेरी लावते.